Category Archives: profkvbelsare

ज्ञानदीप

ज्ञानदीप

।।श्री।।

जीवनातील दीप प्रज्वलित करणारी व्यक्ती, सभोवतालचे जग ज्यांना प्रोफेसर के.वि.बेलसरे म्हणून ओळखायचे ते माझ्यासाठी प.पू. बाबा होते.

स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस, हे माझ्या आई-बाबांचे दैवत असल्यामुळे, अध्यात्म मार्गाची लहानपणापासून गोडी होती. १९८६ साली, आईबरोबर मी मालाडला बाबांच्या घरी गेलो. खूप प्रेमाने व आपुलकीने त्यांनी माझी विचारपूस केली. निघताना, आशीर्वाद दिला.

श्री महाराजांचे चरित्र मी वाचले, त्याच वेळी महाराज माझ्या जीवनात आले. श्रीं चे चरित्र म्हणजे बाबांनी लिहिलेला एक ग्रंथच आहे. सद्गुरू कृपा असल्यावर काय होते याची प्रचीती आहे.

गोंदवल्याच्या उत्सवातील प्रवचने, मालाड मठातील ज्ञानेश्वरीची प्रवचने, मी ऐकली आहेत. प्रवचनातील तत्वज्ञान, महाराष्ट्रातील थोर संत तसेच युरोपियन तत्वज्ञानी यांच्या गोष्टी ऐकून मी अंतर्मुख होऊ लागलो. आयुष्यात गुरू हा सर्वस्व आहे हे, समजायला लागले. सरस्वतीची कृपा असल्यावर काय होते ते प्रवचन ऐकल्यावर वाटते. खूपशी पुस्तके मी वाचली आहेत. अध्यात्म संवाद सारख्या पुस्तकांची मी पारायणे केली होती. मानसपूजा, नामस्मरण, भक्ती, हे विषय खूप भावले.

२००९ साली, बाबांची १०० वी जयंती बेलसरे कुटुंबीय व श्री. महाराजांचे भक्त यांनी मालाडला अत्यंत प्रेमाने साजरी केली. त्यावेळी, सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. त्याच दिवशी रात्री, खोलीभर सुगंधाचा सुवास दरवळत होता. हा अनुभव आला. हा, बाबांनी मला दिलेला प्रसाद समजतो.

नामस्मरण व गुरुसेवा घडो ही च रामचरणी व बाबांच्या चरणी प्रार्थना.

श्रीराम समर्थ।

श्री. नरेंद्र जोशी.

स्तुतिसुमने

स्तुतिसुमने

परमपूज्य बाबा बेलसरे
यांनाविनम्र अभिवादन.

 

|| श्रीराम समर्थ ||

तनूजयांची कृशओजस्वी
वदनी निर्मळ हास्य वसे।
मधुर भाषणें जनां मनाला
नित्य दिलासा लाभतसे॥

नयनां मधुनी स्नेह कृपेचा
अविरत हो वर्षाव खरा।
सदा सांगती तळमळुनी ते
श्रीरामाचे नाम स्मरा॥

तत्वज्ञान श्री महाराजांचे
साऱ्या जगता बोधियले।
आचरुनी ते स्वये जीवनीं
लोकां नामी लावियले ||

गुरु आज्ञा ही प्रमाण होती
सदा जीवनीं सर्व परी।
सुखदुःखाच्या वाटे वरती
महाराजांची साथ खरी॥

गुरुरायांचाआठव त्यांच्या
कंठी गहिवर सहज भरे।
ओलावा नयनात दाटता
रोम रोम पुलकीत खरे॥

असे आपुले बाबा त्यांच्या
नित नतमस्तक चरणीं हे।
कितीसांगती चला लावुया
मन नामाच्या स्मरणीं हे॥

|| जानकी जीवनस्मरण जयजयराम ||

…..स्वानंन्द.

 

||श्रीराम समर्थ||

स्मरे नाम जो सर्वदा
प्रीय ज्यांना ।
जया भेटता स्वस्थ
वाटे जीवांना ॥
निरोपास श्रीं च्या
जनां पोचवीला ।
नमस्कार त्या पूज्य
श्री केशवाला ॥

…. स्वानंन्द.

परिसस्पर्श

परिसस्पर्श

।।श्रीराम समर्थ।।

पूज्य बाबांनी माझा जीवनपटच बदलून टाकला. किती आणि कसा सांगू मी? आज माझे जीवन चिंतारहित व समाधानी बनले आहे ते केवळ पूज्य बाबांच्या प्रेमळ व वात्सल्यपूर्ण सांगण्यामुळे. त्यांचा सहवास जो काही मिळाला त्यामुळे माझे अंतरंगच पालटले.

मी शाळेत शिक्षिका असल्याने ते मला ‘बाई’ च म्हणत. पूज्य बाबा अगदी छोट्या गोष्टींतून खूप मोलाचे सुचवीत असत.

१. मी म्हणजे काळे, गंजलेले धातूचे भांडे असावे त्याप्रमाणे अज्ञानी, चंचल,बडबडी अशा स्वभावाची. पण माझ्यावर बाबांचे खूप प्रेम होते कारण त्यांच्या वागण्यातून मला ते जाणवायचे.
पूज्य बाबांच्या समोर एक सतरंजी आंथरलेली असावयाची. त्यावर बाबांना भेटणारे, प्रश्न विचारणारे बसावयाचे, उठायचे.
सतरंजीला खूप सळ पडायचे. वाकडी तिकडी पण व्हायची. मी तेथे जवळ बसून परत परत सारखी करावयाची. पूज्य बाबा मला म्हणाले, “ बाई, तुम्ही हे काय करता? किती वेळा करणार? हे सळ असेच पडणार. अहो, संसार असाच असतो. तो आपण कितीही आणि कशाही तर्हेने सुखी अगदी सोयीस्कर करावयाचा म्हटला तरी त्यात अडी-अडचणी, संकटे, कष्ट, दुःख येणारच. संसारात समाधानी राहण्याचे एकच साधन ते म्हणजे मनापासून श्रद्धा ठेवून केलेले ‘नामस्मरण’ हाच एकमात्र उपाय!

२. असाच एक प्रसंग सांगते माझ्या जीवनात घडलेला आणि पूज्य बाबांनी मला कसे तारून नेले त्या प्रसंगातून.
त्या रात्री मला खूप रडू आवरेनासे झाले. आणि दुःख पण झाले कारण मी रागवून, निराश होऊन, आपण कोणत्याच लायकीचे नाही म्हणूनच पूज्य बाबांनी मालाडहून त्यांच्या घरातून जायला सांगितले असे वाटले. पण त्या गुरुवारी संध्याकाळपासून पूर्ण महाराष्ट्रात, अकस्मात वीज जाऊन (तांत्रिक बिघाड) पूर्ण रात्रभर काळोख होता.
त्या दिवशी गुरुवारी साधारण पाच-सहा वाजता, मी बाबांच्या घरात, अगदी मागे जाऊन बसले होते. मी अगदी नवीन, चार-पाच दिवसच झाले होते. मालाडमधे कोणी ओळखीचे पण नव्हते. ती. बाबांची आदरयुक्त भीती वाटत होती. संध्याकाळ होत आली आणि बाबांनी मला बोलावून सांगितले की, “ बाई तुम्ही आता निघा आणि अगदी सरळ घरी जा.” मला सगळ्यांसमोर घरी जायला सांगितले या गोष्टीचे मला खूप वाईट वाटले आणि मनात म्हटले आपली लायकीच नाही तर कशाला यावे परत? मी निराश होऊन लोकलने सुखरूप गोरेगाव स्टेशनवर पोहोचले आणि घरी जाऊन दार उघडले, आणि लाईट गेले. अंधार झाला. पूर्ण महाराष्ट्र रात्रभर काळोखात होता. त्यावेळेस पूज्य बाबांनी मला घरी पाठविले नसते, तर काय झाले असते माझे? न घरात न रसत्यात. रात्री विचार करून मी मनातल्या मनात पूज्य बाबांची क्षमा मागितली. कारण तेच माझे तारणहार आणि संकटातून वाचविणारे. त्यानंतर पुढील गुरुवारी हसत म्हणाले, “ आलात का तुम्ही?” आजही बाबा माझ्या पाठीशी आहेत ही पूर्ण श्रद्धा आहे माझी.

३. मी शाळेतून निवृत्त झाले होते. रजा घेण्याचा तर प्रश्नच नव्हता. माझे यजमान पण निवृत्त झालेले होते. श्री सोमण महाराजांकडे मठात यावयाचे, त्यांच्या आग्रहावरून, आम्ही दोघे पंढरीची वारी करण्याकरता गेलो. वारी करून आल्यानंतर मी अगदी काळीकुट्ट, काळी ठिक्कर फक्त दात पांढरे, आणि डोळे तेवढेच पहिल्यासारखे दिसत होते. ओळखू न येण्याइतका बदल झाला होता. सगळेजण पाहतच राहिले. रविवारी प्रवचन झाल्यावर पूज्य बाबांच्या पाया पडले. ते काय म्हणाले, “ काय ही तुमची दशा आणि काय ही तुमची तब्येत! अहो, इतके कष्ट करून, सोसत नसतानाही तुम्ही पंढरपूरला गेलात आणि सगळेजण तुम्हाला पाहून हसतात म्हणून दुःखी होता. अहो! इतके कष्ट करून तुम्ही पंढरपूरला गेलात आणि काळ्या झालात म्हणून असमाधानी झालात. हे च जर या पूर्ण दिवसात नाम घेतले असते, भावपूर्ण नामस्मरण केले असते तर तुमचा हेतू साध्य होऊन, भगवंताची कृपा झाली असती. पंढरपूरची वारी करून, नामस्मरण न करता, भगवंताची प्राप्ती झाली असती तर श्री.महाराजांनी सगळ्यांना पंढरपूरला पाठविले असते नाही का?
मनापासून नाम घ्या. समाधानी व्हाल.” आणि मग हसून म्हणाले, “ काळजी करू नका परत पहिल्यासारख्या दिसाल.”

४. आज घरात मी एकटीच आहे. पण निर्भय, समाधानी, आनंदी आहे. कारण नामस्मरण माझा आधार आहे. खूप आधी बाबांनी जणू माझे भवितव्य जाणले होते कि काय? बाबा मला म्हणाले, “ हे पहा बाई, आयुष्यात एकटे राहण्याचा प्रसंग आला तरी, नामस्मरणाची संगत तारून नेते. नाम घेतल्याने नामधारक शांत, समाधानी व आनंदात राहतो. हा अनुभव आजही माझ्या जमेला आहे.
अजूनही पूज्य बाबांच्या घरात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. खूप समाधान आनंद होतो त्यांच्या घरी गेल्यावर!
पूज्य बाबांच्या कुटुंबातील सर्वजण सर्वांशी इतके प्रेमाने वागतात, बोलतात, आपलेसे करतात हीच तेथे पूज्य बाबा अजून आहेत याची पावती. श्री. दादा, सौ. शोभना वहिनी, तिघी गोड सुविद्य, गोड स्वभावाच्या नाती मला काय सगळ्यांनाच आपलेसे करून घेतात. याहून जास्त काय सांगू? मी, पूज्य बाबांच्या सहवासाने, त्यांची प्रवचने ऐकून, माझ्या पोरकट शंकांचे निरसन करून घेऊन, जीवनात कृतकृतार्थ झाले आहे.

–  सौ. नलिनी उन्हेलकर, गोरेगाव (पू).

सहवास

सहवास

परमपूज्य ती. बाबांच्या आठवणी

१९८२ साली मी, उषा सबनीस आणि माझे यजमान दादा सबनीस, डिसेंबर महिन्यात माझे दीर डॉ. रमेश सबनीस श्री. केतकरांच्या घरातल्या प.पू गोंदवलेकर महाराजांच्या मठात दर्शनाला गेलो. नंतर ती. बेलसरे बाबांना भेटायला गेलो. डिसेंबर मधेच लगेच गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असल्याचं कळलं. उत्सवाला येण्याची आमची इच्छा बाबांना सांगितली. बाबांनी बरोबर येण्याची इच्छा मान्य केली. ती. बाबांबरोबर शेवटपर्यंत आमच्या गाडीतून जाण्या-येण्यामुळे बाबांचा खूप सहवास मिळाला.

मी १० वर्षाची असताना माझे वडील वारले. ती. बाबांचे व माझे वय सारखेच असल्याने, मी मनापासून बाबांना वडिलांच्या ठिकाणीच मानायचे. समोर आलेल्या माणसाचे अंतरंग ओळखून, त्याला समजेल अशा भाषेत ते त्याला समजावून सांगायचे. त्यामुळे समाधान व्हायचे. मी माझ्या मनात अध्यात्माविषयी येणारे प्रश्न बाबांना विचारायची. त्यांच्याकडून मला मिळालेल्या उत्तरातून अध्यात्म म्हणजे काय ह्याची खरी जाणीव झाली. आणि मला जगण्यातला खरा आनंद मिळाला. नुसत्या माळा ओढून ते ज्ञान होत नाही तर शांती समाधान आणि आनंद आपल्याला किती मिळतोय आणि प्रत्येक गोष्ट महाराजांच्या इच्छेनेच होत असते आणि त्यातच आनंद मानणं ही खरी शिकवण मला ती. बाबांकडूनच मिळाली. बाबा नेहमी म्हणायचे तुमचा संसारयोग चांगला आहे. तुमची मुलं, नातेवाईक, स्नेही, सर्वांशी तुमचे चांगले संबंध आहेत. कोणत्याही परिस्थितीत आनंदाने कसे जगावे, ह्याची शिकवण मला ती. बाबांकडूनच मिळाल्याने आयुष्य आनंदात चाललयं.

– श्रीमती. उषा सबनीस

गुरुभेट

गुरुभेट

।। श्रीराम ।।

२० मार्च, २०१८

साधारणपणे १९८० ते १९८२ च्या दरम्यान मला आतून प्रेरणा झाली की, प्रो. ती. केशव विष्णु बेलसरे यांना भेटावे. मी त्यांची पुस्तके वाचत होते. विशेषतः पूज्य श्री. महाराजांचे चरित्र. माझ्या अॉफिसमधल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मला दर रविवारच्या मालाडला होणाऱ्या प्रवचनांविषयी सांगितले. मी मनाशी ठरविले की, प्रवचन एकदा तरी ऐकायचेच! मला असेही समजले होते की, आपल्याला काही प्रश्न पडले असतील, तर त्यांची उत्तरेही त्या प्रवचनांतून मिळतात. अर्थात परीक्षा म्हणून नाही, पण genuinely, मी काही प्रश्न मनांत ठेवून प्रवचनाला येत गेले व मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. त्यानंतर एक दृढ विश्र्वास मनात निर्माण झाला. व मी नियमितपणे दर रविवारी प्रवचनाला येऊ लागले. कधी कधी अगदी शेवटी उभे रहायला लागायचे. पण एकच निष्ठा की प्रवचन ऐकायचेच. माझ्या संकोची स्वभावामुळे, मी दूर उभी राहून प्रवचन संपल्यानंतर इतरांचे प्रश्न व त्यांची उत्तरे प्रोफेसर साहेबांकडून ऐकायचे. पण हळूहळू अशीच पाच-सात वर्षे गेली. व मी ही धिटाईने प्रोफेसर साहेबांना प्रश्न विचारू लागले. मग माझ्या लक्षात आले की आपण ज्यांना प्रश्न विचारतो ते नुसते प्रोफेसर नाहीत तर पूज्य श्री. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य / अनुयायी आहेत. व सर्व साधक लोक त्यांना ‘बाबा’ म्हणतात. मग मी ही ती. बाबांना प्रश्न विचारू लागले. मला आठवते एकदा प्रवचन झाल्यावर मी ती. बाबांना म्हणाले, “ बाबा, आज खूप आनंदाचे डोही आनंद तरंग झाले. खरंच, ज्ञानेश्र्वरी इतकी सुंदर व आनंद देणारी आहे. केवळ तुमच्यामुळे! नाहीतर मी घाबरत होते.” त्यावर ते मला म्हणाले, “ तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा- मूळ ज्ञानेश्वरी वाचा. वाचत जा!” हे त्यांनी एकदा नाही अनेकदा मला सांगितले. तसेच, एकदा मी त्यांना नमस्कार केला व त्यांच्या तोंडून शब्द आले, “ नामांत आहेस – नामातच रहा!” मी क्षणभर भांबावले की ती. बाबांना कसे कळले की मी नामस्मरण करते ते!

ती. बाबा एक पारमार्थिक उच्चाधिकारी आहेत ह्याची प्रचिती पदोपदी येत होती. ती. बाबांचे मृदु गोड बोलणे पण त्याचबरोबर ठामपणे नामाविषयी, पारमार्थिक गोष्टींबद्दल बोलणे व त्यामागचा त्यांचा अभ्यास व साधना दिसत होती. कुठलाही बडेजाव नाही. अत्यंत निगवी साधेपणा. आम्ही नमस्कार केला, की ते पटकन् हात जोडत. नम्रपणा ! श्री. गोंदवलेकर महाराजांचे परमभक्त. मला तर ते ‘Messenger of Maharaj’ चं वाटत. मी स्वतः काही खूप हुशार नाही की माझा तत्वज्ञानाचा अभ्यास नाही. पण ती. बाबांमुळे हा अभ्यास करण्याची इच्छा होते. पण एक ठामपणे वाटते की, त्यांच्यासारखे साधन तरी आमच्या हातून व्हावे. तत्वज्ञानाचा अभ्यास ही एक गोष्ट. पण साधन होणे हे महत्त्वाचे! जे ती. बाबांनी प्रवचनांतून, वारंवार आमच्या मनावर ठसविले. मला स्वतःला असे वाटते की ती. बाबांनी आम्हाला “विचार” कसा करावा हे शिकवले. जे आताच्या शिक्षण पद्धतीत शिकवले जात नाही. त्यामुळे, जीवनातले बरेचसे प्रश्र्न, प्रश्र्न न राहाता, त्यांची उत्तरे सहज मिळत गेली. कधी कधी असे स्वस्थ बसले असताजाणवते, की ती. बाबांचे आमच्यावर किती उपकार आहेत. त्यांनी आम्हाला नामाविषयी खूप भरभरून सांगितले व साधा सरळ परमार्थ काय ? हे सांगितले. अर्थात, देहाने जरी ती. बाबा आता नसले तरी त्यांची ग्रंथसंपदा ही आमची गुरुभेट ! ते आमचे गुरु आहेत.

ती. बाबांचे देहावसान झाले त्या दिवशी आम्ही नातेवाईकांसोबत अश्रू भरल्या डोळ्यांनी मठात आलो. श्री. महाराजांच्या समोर त्यांना ठेवले होते. दुःखदायक घटना होती. पण त्या ठिकाणी एक पवित्रपणा जाणवत होता. व हलकासा चंदनाचा सुगंध जाणवत होता. आतून जाणवत होते की ह्या पवित्र देहातील आत्मा अनेक वर्षे नामसाधना करीत असे. . हा एक सुखदायक अनुभव होता. परमार्थातला उच्चकोटीचा अनुभव होता. जाता जाता बाबांनी संदेश दिला की नामस्मरणाने काय किमया घडू शकते.

लौकिक दृष्ट्या ती. बाबांचे कुटुंब म्हणजे त्यांच्या सौ. पत्नी, चिरंजीव व सूनबाई आणि त्यांच्या गोड नाती. पण ज्ञानेश्वरी सांगता सांगता, नामस्मरण करता करता ती. बाबांचे कुटुंब विस्तारत गेले. जणू काही “हे विश्वचि माझे घर” अशा तऱ्हेने ती. बाबा विस्तारीत कुटुंबाचे नकळत कुटुंब प्रमुख बनून गेले.

अशा अनेक आठवणी आहेत परंतु ह्या प्रातिनिधीक स्वरुपातल्या आहेत. ती. बाबांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. पण त्यातील महत्वाचा पैलू म्हणजे नामाबद्दलचे प्रेम व साधना! सर्व साधारण माणसाला समजेल अशा भाषेत परमार्थ समजावून सांगणारे एक थोर चिंतक, तत्वज्ञ, साधक ! माझे ती. बाबांना नमस्कार !

– सौ. कल्याणी. गि. पंडित (मीरारोड – पू)

माझे मनोगत

माझे मनोगत

ती. बाबांना प्रमोदिनीचा साष्टांग नमस्कार.

बाबा, माझ्या लग्नानंतर आपण मला ६.११.१९८० रोजी, एक पत्र लिहिले होते. त्यानंतर आपली कधी कधी प्रत्यक्ष भेटही झाली. पण नेहमी प्रपंचाविषयी बोलणे व्हायचे आणि पत्राविषयी नाही. म्हणूनच आज मी हे लिहीत आहे.

लग्नापूर्वी आपला प्रत्यक्ष सहवास मला बरीच वर्षे लाभला. आपण मला सर्वतोपरी मार्गदर्शन केले , खूप शिकवले. “नामाचा अभ्यास वाढवावा, त्यानेच जीवनात समाधान मिळते.” असे आपले सांगणे असे. पण बाबा नामाचा अभ्यास वाढविणे मला जमले नाही, हे मनापासून कबूल करते. त्याबद्दल क्षमा असावी. याचे वाईट वाटत आहे. यापुढे मी नक्की प्रयत्न करीन.

प्रत्यक्ष नसला, तरी मानसिक पातळीवरचा आपला सहवास मला कायम आहेच. रा. श्रीपाद दादा आणि सौ. शोभना वहिनी , यांचेही मला मार्गदर्शन असते. बाकी सर्व व्यवस्थित आहे.

–  आपली, प्रमोदिनी दाते. ( सौ. नीति मुकुंद गद्रे. )

“मला माझ्या गुरूंची आज्ञा आहे.”

“मला माझ्या गुरूंची आज्ञा आहे.”

इ.स. १९८५ मधे बाबांना खूप ताप आला. छाती कफाने भरली होती. बोलताना धाप लागत होती. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांची रक्त तपासणी करण्यासाठी मला संधी देण्यात आली होती. त्यांच्या रक्ताचा नमूना बाटलीत काढून घेतल्यानंतर मला राहवेना. म्हणून मी म्हटलं, “बाबा, तुम्हाला खूप त्रास होतोय. केवढा ताप आणि अशक्तपणा आला आहे! या रविवारी निरुपणाचा त्रास न घेतलातर बरे होईल. विश्रांती नाही का घेणार?”

निरुपण न करता विश्रांती घेणे ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. अत्यंत अशक्तपणा आलेला असतानाही ते ताड्कन बिछान्यात उठून बसलेआणि ठासून शब्दा-शब्दावर जोर देत म्हणाले, “गुरुआज्ञा म्हणजे काय हे कळतं का तुम्हाला? माझ्या जिवात जीव असेपर्यंत, शेवटच्या श्र्वासापर्यंत मी निरुपण सोडणार नाही, माझ्या गुरुची मला आज्ञा आहे, समजलांत? “

हे बोलतानाही त्यांना धाप लागली होती, कपाळावर घाम आला होता, त्यांच्या डोळ्यांतील तेज मला सहन झालं नाही. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन मी घरी आले.खरोखरच बाबांनी आपला शब्द खरा केला. १९९७ च्या डिसेंबर महिन्यात श्री महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळी अक्षरशः बिछान्याला खिळलेले असतानाही त्यांनी निरुपणे केली. अखेरचा श्र्वास चालू असेपर्यंत नामाचे, ईश्र्वरभक्तीचे महत्व लोकांना सांगत राहिले. ही गुरुनिष्ठा आम्ही पाहिली. अंतःकरण गलबलून गेलं, अश्रू ही मुके झाले.

–  सौ. माधवी. श. कवीश्र्वर

शिदोरी

शिदोरी

“श्रीराम समर्थ”

ति. बाबा ( प्रो. के. वि. बेलसरे )

ज्या व्यक्तिमुळे आमचं जीवन जगण श्रीमंत, समृद्ध झाले त्यांच्याबद्दल लिहिणे कठीण आहे. प्रयत्न करते.

ति. बाबा हे श्री.महाराजांचे ( श्री.ब्रह्मचैतन्य गोंदावले महाराज) निष्ठावंत साधक, भक्त शिष्य. ते विनोदाने, “ मी महाराजांचा बोंबल्या आहे” असे म्हणत. यावरुन त्यांच्यातील लीनता, नम्रता दिसून येते.

श्री. महाराजांचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम होते. श्री. महाराजांचा निरोप सांगण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता असे वाटते.

श्री. महाराज हे नामावतार होते. सबंध आयुष्यभर ति. बाबांनी महाराजांचा निरोप महणजेच नामाचे महत्व, जे जे त्यांच्या संपर्कात आले त्यांना सांगितले. जगभरातून लोक त्यांना, आपल्या शंका विचारायला येत आणि समाधान पावून जात.

त्यांनी स्वतःच्या साधनमार्गातील अभ्यासापासून ते त्यांचे जवळील सर्व परमार्थ मार्गातील ज्ञान जगासाठी पुस्तकरुपाने ठेवले आहे. स्रर्व स्वानुभवाचे असल्यामुळे, “बोले तैसा चाले” ही उक्ती त्यांना चपलखपणे लागू पडते.

श्री. महाराजांची आज्ञा आली म्हणून त्यांनी प्रवचने केली. आणि ती आज्ञा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळली. ते आज्ञापालनाचा आदर्श होते.

अतिशय अभ्यासू वृत्तीमुळे, त्यांची प्रवचने म्हणजे अप्रतिम श्रवणकाळ असायचा. अध्यात्म शक्य तितक्या सोप्या शब्दांत सांगायचे. मधेच हलकासा विनोद आणि जगभरातील तत्वज्ञान्यांच्या विचारांचा असा अध्यात्मिक जगप्रवास असायचा. चार हजार ग्रंथ वाचले पण नामाला पर्याय नाही, हा श्री. महाराजांचा निरोप अत्यंत कळकळीने त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवला.

“परमार्थ म्हणजे काय ते या जन्मात समजून तरी घ्या.” असे ते नेहमी म्हणत.

“प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो”, हा श्री. महाराजांचा निरोप त्यांनी अतिशय प्रेमाने आणि स्वतः तसे अभ्यासपूर्ण जगून, सर्वांना समजेल अशा भाषेत लोकांपर्यंत पोहोचवला.

अत्यंत शांत, प्रेमळ पण ठाम, आणि प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व.
गाडी थंडावतेय. चला पेट्रोल भरुन यावं, अस म्हणून आम्ही ति. बाबांकडे जात होतो आणि पुढच्या भेटीपर्यंतची शक्तीची शिदोरी घेऊन येत होतो. आज आता ते देहात नाहीत पण त्यांची आठवण आली नाही असा दिवस गेला नाही. आणि त्यामुळे त्यांची आठवण आली की ते आपल्या जवळच आहेत असं वाटत आणि आम्ही निश्चिंत होतो. अशा उत्तुंग आणि हिमालया एवढ्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिताना शब्द तोकडेच आहेत.

ती. बाबांना माझा विनम्र प्रणाम.

–  सौ. मुग्धा पेंढारकर (ठाणे).

दंडवत

दंडवत

अथांगता ज्ञानाची हेच ज्यांच मूळ व्यक्तिमत्व ते अति सामान्यांच्या अति संकुचित व्रुत्तीत उतरवण्याची त्यांची

तळमळ जीवाला मोहिनी घालणारीच आहे……..

परमतत्वाकडे सतत धाव घेण्याची त्यांची आस व झेप व त्या धावपट्टीवर इतरांना(सामान्यांना) उतरवण्याची त्यांची शक्ती व त्यांनी केलेला अविरत प्रयत्न / अविरत प्रवास ह्या स्वर्गीय दिव्यते पायी मन नमलं नाही तरच नवल………..

अति भाग्यवंतांनाच हा सहवास ……प.पू. महाराजांच्या ह्या क्रुपा वर्षावाचा आनंद अभेद्य आहे……फक्त मन:पूर्वक नमन ! दंडवत…….

–  (उपाध्ये कन्या ) सौ सीमंतिनी ठकार…..

आशीर्वाद

आशीर्वाद

।। श्रीराम ।।

“आपले प.पू. बाबा “

मी प.पू बाबांना अगदी प्रथम कधी भेटले ते नेमकं आठवत नाही. खूपच लहान होते. माझे वडील कै. प्रा. प्र. म. उपाध्ये हे बाबांचे सिद्धार्थ कॉलेजमधले विद्यार्थी आणि बाबांचे ‘लाडके’ विद्यार्थी! आई-अण्णा (माझे वडील) आम्हा दोघी लहान बहिणींना घेऊन, बऱ्याच वेळी बाबांच्या घरी घेऊन जात. त्यावेळी बाबा म्हणजे कोण हे काहीच कळत नव्हतं. पण तिथे जायला खूप आवडायचे. कारणे मात्र मजेशीर होती. कारण प.पू. बाबा म्हणजे ते ‘अजोबा’ खूप प्रेमळ होते, तशाच आज्जी पण प्रेमळ! त्यांची नात ‘वैजयंती’ माझ्यापेक्षा लहान पण तिच्याबरोबर खेळायला मजा यायची. बाबांचे सुपुत्र म्हणजे श्रीपादकाका, शोभाकाकू खूप अगत्याने, प्रेमाने आमचे स्वागत करीत असत. आणि प्रत्येक वेळी, आज्जी आणि शोभाकाकू काहीतरी छान खाऊ म्हणजे लाडू, वड्या वगैरे पुढे ठेवत. त्याचही भलतच आकर्षक ! एकूण काय बाबांकडे म्हणजे एका खूप छान प्रेमळ अजोबांकडे जायचं हा आनंद अवर्णनीय असायचा.

हळूहळू काही गोष्टी वाढत्या वयानुसार समजायला लागल्या. मोठे मोठे उद्योगपती, डॉक्टर्स, प्रथितयश कलाकार प.पू. बाबांच्या पाया पडत. त्यांचे शब्द कानात प्राण आणून ऐकत. ते पाहिल्यावर ‘बाबा’ हे काहीतरी वेगळे रूप आहे, याची जाणीव होऊ लागली. माझ्या वडिलांचा महणजे ती. अण्णांचा आणि प.पू. बाबांचा संवाद बहुतेक वेळा अभ्यासासंदर्भात, तत्वज्ञान, संस्कृतबद्दल असे. पण त्या वयात तेवढी प्रगल्भता नव्हती, त्यामुळे ‘हे’ संवाद लिहून ठेवलेे नाहीत. बऱ्याच वेळा ती. अण्णांबरोबर प.पू बाबांकडे जायचे. आदरयुक्त भीतीने मी गप्पच असायचे. आम्ही निघालो की माझी विचारपूस करून, “या बरं बाळ ” म्हणायचे. ते शब्द अजूनही मनांत, कानात बसलेत! त्या “ या बरं बाळ “ मध्ये फार फार मोठे आशीर्वाद दडले होते, हे आता आता कळतयं.

प.पू. बाबांच्या आठवणी तशा बऱ्याच आहेत. पण त्यातली एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. माझी आई अचानक हार्ट attack ने गेली. त्यावेळी माझं वयं साधारणतः २५ असेल. आईने शेवटचा श्र्वास घेतला त्यावेळी तिचे नामःस्मरण चालू होते. मी तिच्या बाजूलाच बसले होते. ती अत्यंत समाधानात होती. इतक्या अचानक माझ्या डोळ्यादेखत ती गेली, याचा मला प्रचंड धक्का बसला. सर्वांनी सांगूनही, माझं दुःख काही कमी होईना! शेवटी, ती. अण्णा मला प.पू बाबांकडे घेऊन गेले. मी रडतच त्यांना नमस्कार केला. मला वाटलं, आता हे काहीतरी खूप मोठं अध्यात्म तत्वज्ञान सांगणार ! पण तसं काही न म्हणता, प.पू. बाबा पहिले वाक्य काय म्हणाले? “ बाळ ! तुला इतकं दुःख होणं नैसर्गिक, सहाजिक आहे बरं का ! शेवटी तुझी ‘आई ‘ होती ना!” का माहित नाही, या एकाच वाक्यानं इतका धीर आला, की मला ‘जे होतयं’ ते सहाजिक आहे. मग म्हणाले, “ आपलं आईवर इतकं प्रेम आहे, मग इतकं दुःख केल्यावर तिलाच वाईट वाटले ना? बघ, महाराज साधकाचा अंतकाळ कसा साधतात, हे तुला बघायला मिळालं. नामःस्मरण करताना आई गेली हे आपलं भाग्य आहे ना? तेंव्हा इतकं दुःख नको बरं !”

प.पू. बाबांचे हे शब्द म्हणजे जणू शक्तिपात! त्या क्षणापासून मी दुःख सावरुन पुनः उभी राहिले. त्यानंतर छोट्या मोठ्या प्रापंचिक अडचणींसाठी त्यांच्याकडे धावायचे. त्यांचा एखाद- दुसरा शब्द हा जणू साक्षात भगवंताचा आधार असायचा ! बाबांचा मिळालेला सहवास आणि मार्गदर्शन, ही माझ्या आयुष्यातील ‘कमाई’ आहे असं मी समजते. तर याच आधारावर, पुढील वाटचाल चालू आहे.

–  सौ.द्युती उपाध्ये केसकर.