शिदोरी
“श्रीराम समर्थ”
ति. बाबा ( प्रो. के. वि. बेलसरे )
ज्या व्यक्तिमुळे आमचं जीवन जगण श्रीमंत, समृद्ध झाले त्यांच्याबद्दल लिहिणे कठीण आहे. प्रयत्न करते.
ति. बाबा हे श्री.महाराजांचे ( श्री.ब्रह्मचैतन्य गोंदावले महाराज) निष्ठावंत साधक, भक्त शिष्य. ते विनोदाने, “ मी महाराजांचा बोंबल्या आहे” असे म्हणत. यावरुन त्यांच्यातील लीनता, नम्रता दिसून येते.
श्री. महाराजांचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम होते. श्री. महाराजांचा निरोप सांगण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता असे वाटते.
श्री. महाराज हे नामावतार होते. सबंध आयुष्यभर ति. बाबांनी महाराजांचा निरोप महणजेच नामाचे महत्व, जे जे त्यांच्या संपर्कात आले त्यांना सांगितले. जगभरातून लोक त्यांना, आपल्या शंका विचारायला येत आणि समाधान पावून जात.
त्यांनी स्वतःच्या साधनमार्गातील अभ्यासापासून ते त्यांचे जवळील सर्व परमार्थ मार्गातील ज्ञान जगासाठी पुस्तकरुपाने ठेवले आहे. स्रर्व स्वानुभवाचे असल्यामुळे, “बोले तैसा चाले” ही उक्ती त्यांना चपलखपणे लागू पडते.
श्री. महाराजांची आज्ञा आली म्हणून त्यांनी प्रवचने केली. आणि ती आज्ञा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळली. ते आज्ञापालनाचा आदर्श होते.
अतिशय अभ्यासू वृत्तीमुळे, त्यांची प्रवचने म्हणजे अप्रतिम श्रवणकाळ असायचा. अध्यात्म शक्य तितक्या सोप्या शब्दांत सांगायचे. मधेच हलकासा विनोद आणि जगभरातील तत्वज्ञान्यांच्या विचारांचा असा अध्यात्मिक जगप्रवास असायचा. चार हजार ग्रंथ वाचले पण नामाला पर्याय नाही, हा श्री. महाराजांचा निरोप अत्यंत कळकळीने त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवला.
“परमार्थ म्हणजे काय ते या जन्मात समजून तरी घ्या.” असे ते नेहमी म्हणत.
“प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो”, हा श्री. महाराजांचा निरोप त्यांनी अतिशय प्रेमाने आणि स्वतः तसे अभ्यासपूर्ण जगून, सर्वांना समजेल अशा भाषेत लोकांपर्यंत पोहोचवला.
अत्यंत शांत, प्रेमळ पण ठाम, आणि प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व.
गाडी थंडावतेय. चला पेट्रोल भरुन यावं, अस म्हणून आम्ही ति. बाबांकडे जात होतो आणि पुढच्या भेटीपर्यंतची शक्तीची शिदोरी घेऊन येत होतो. आज आता ते देहात नाहीत पण त्यांची आठवण आली नाही असा दिवस गेला नाही. आणि त्यामुळे त्यांची आठवण आली की ते आपल्या जवळच आहेत असं वाटत आणि आम्ही निश्चिंत होतो. अशा उत्तुंग आणि हिमालया एवढ्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिताना शब्द तोकडेच आहेत.
ती. बाबांना माझा विनम्र प्रणाम.
– सौ. मुग्धा पेंढारकर (ठाणे).