आशीर्वाद
।। श्रीराम ।।
“आपले प.पू. बाबा “
मी प.पू बाबांना अगदी प्रथम कधी भेटले ते नेमकं आठवत नाही. खूपच लहान होते. माझे वडील कै. प्रा. प्र. म. उपाध्ये हे बाबांचे सिद्धार्थ कॉलेजमधले विद्यार्थी आणि बाबांचे ‘लाडके’ विद्यार्थी! आई-अण्णा (माझे वडील) आम्हा दोघी लहान बहिणींना घेऊन, बऱ्याच वेळी बाबांच्या घरी घेऊन जात. त्यावेळी बाबा म्हणजे कोण हे काहीच कळत नव्हतं. पण तिथे जायला खूप आवडायचे. कारणे मात्र मजेशीर होती. कारण प.पू. बाबा म्हणजे ते ‘अजोबा’ खूप प्रेमळ होते, तशाच आज्जी पण प्रेमळ! त्यांची नात ‘वैजयंती’ माझ्यापेक्षा लहान पण तिच्याबरोबर खेळायला मजा यायची. बाबांचे सुपुत्र म्हणजे श्रीपादकाका, शोभाकाकू खूप अगत्याने, प्रेमाने आमचे स्वागत करीत असत. आणि प्रत्येक वेळी, आज्जी आणि शोभाकाकू काहीतरी छान खाऊ म्हणजे लाडू, वड्या वगैरे पुढे ठेवत. त्याचही भलतच आकर्षक ! एकूण काय बाबांकडे म्हणजे एका खूप छान प्रेमळ अजोबांकडे जायचं हा आनंद अवर्णनीय असायचा.
हळूहळू काही गोष्टी वाढत्या वयानुसार समजायला लागल्या. मोठे मोठे उद्योगपती, डॉक्टर्स, प्रथितयश कलाकार प.पू. बाबांच्या पाया पडत. त्यांचे शब्द कानात प्राण आणून ऐकत. ते पाहिल्यावर ‘बाबा’ हे काहीतरी वेगळे रूप आहे, याची जाणीव होऊ लागली. माझ्या वडिलांचा महणजे ती. अण्णांचा आणि प.पू. बाबांचा संवाद बहुतेक वेळा अभ्यासासंदर्भात, तत्वज्ञान, संस्कृतबद्दल असे. पण त्या वयात तेवढी प्रगल्भता नव्हती, त्यामुळे ‘हे’ संवाद लिहून ठेवलेे नाहीत. बऱ्याच वेळा ती. अण्णांबरोबर प.पू बाबांकडे जायचे. आदरयुक्त भीतीने मी गप्पच असायचे. आम्ही निघालो की माझी विचारपूस करून, “या बरं बाळ ” म्हणायचे. ते शब्द अजूनही मनांत, कानात बसलेत! त्या “ या बरं बाळ “ मध्ये फार फार मोठे आशीर्वाद दडले होते, हे आता आता कळतयं.
प.पू. बाबांच्या आठवणी तशा बऱ्याच आहेत. पण त्यातली एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. माझी आई अचानक हार्ट attack ने गेली. त्यावेळी माझं वयं साधारणतः २५ असेल. आईने शेवटचा श्र्वास घेतला त्यावेळी तिचे नामःस्मरण चालू होते. मी तिच्या बाजूलाच बसले होते. ती अत्यंत समाधानात होती. इतक्या अचानक माझ्या डोळ्यादेखत ती गेली, याचा मला प्रचंड धक्का बसला. सर्वांनी सांगूनही, माझं दुःख काही कमी होईना! शेवटी, ती. अण्णा मला प.पू बाबांकडे घेऊन गेले. मी रडतच त्यांना नमस्कार केला. मला वाटलं, आता हे काहीतरी खूप मोठं अध्यात्म तत्वज्ञान सांगणार ! पण तसं काही न म्हणता, प.पू. बाबा पहिले वाक्य काय म्हणाले? “ बाळ ! तुला इतकं दुःख होणं नैसर्गिक, सहाजिक आहे बरं का ! शेवटी तुझी ‘आई ‘ होती ना!” का माहित नाही, या एकाच वाक्यानं इतका धीर आला, की मला ‘जे होतयं’ ते सहाजिक आहे. मग म्हणाले, “ आपलं आईवर इतकं प्रेम आहे, मग इतकं दुःख केल्यावर तिलाच वाईट वाटले ना? बघ, महाराज साधकाचा अंतकाळ कसा साधतात, हे तुला बघायला मिळालं. नामःस्मरण करताना आई गेली हे आपलं भाग्य आहे ना? तेंव्हा इतकं दुःख नको बरं !”
प.पू. बाबांचे हे शब्द म्हणजे जणू शक्तिपात! त्या क्षणापासून मी दुःख सावरुन पुनः उभी राहिले. त्यानंतर छोट्या मोठ्या प्रापंचिक अडचणींसाठी त्यांच्याकडे धावायचे. त्यांचा एखाद- दुसरा शब्द हा जणू साक्षात भगवंताचा आधार असायचा ! बाबांचा मिळालेला सहवास आणि मार्गदर्शन, ही माझ्या आयुष्यातील ‘कमाई’ आहे असं मी समजते. तर याच आधारावर, पुढील वाटचाल चालू आहे.
– सौ.द्युती उपाध्ये केसकर.
नमस्कार केसकर ताई!! तुम्ही किती भाग्यवान आहात, तुम्हाला तुमच्या लहानपणापासून ती. बाबांचा सहवास मिळाला…
अजून काही आठवणी लिहा…
द्युती तू ती. बाबांच्या छान आठवणी लिहिल्या आहेस. ती. अण्णांमुळे तुला अशा थोर व्यक्तींचा सहवास व मार्गदर्शन लाभले. आठवणी वाचताना डोळ्यांत पाणी आले. अशीच लिहीत रहा.