स्मृति

स्मृति

।। श्री राम समर्थ ।।
कृतज्ञता
————————

आनंदमय जेव्हा असते मानस,
किंवा असतो क्षणिक उदास,
क्षणोक्षणी तुम्हीच मनी,
असता होऊन आठवणी।।

२६ मे १९८५ या दिवशी पूज्य बाबांची (श्री के. वि. बेलसरे) पहिल्यांदा भेट झाली, ओळख झाली, आणि बोलणेही झाले. तेव्हापासून आज २८ वर्षे, मी श्री महाराजांच्या व पूज्य बाबांच्या आणि त्यांच्या विचारांच्या सान्निध्यात आहे. अर्थात श्री. महाराजांचे व पूज्य बाबांचे विचार वेगळे नव्हते. पूज्य बाबांची एकएक आठवण म्हणजे अत्तराची एक एक कुपी आहे. कोणतीही कुपी उघडावी आणि त्या आठवणीत रमून जावे. श्री. महाराजांच्या शतसांवत्सरिक पुण्यतिथीच्या निमित्ताने, ज्यांच्यामुळे श्री महाराज कळाले, त्या पूज्य बाबांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.

पूज्य बाबांशी प्रत्यक्ष बोलणे होऊन, शेवटची भेट ११ डिसेंबर १९९७ या दिवशी झाली. या दोन्ही दिवशी (२६ मे १९८५ व ११ डिसेंबर १९९७) माझ्या मनातले ओळखून पूज्य बाबांनी मला काही गोष्टी सुचवल्या, सांगितल्या. ह्या १२॥ वर्षात असे अनुभव पूज्य बाबांनी अनेकदा दिले. त्यामुळे त्यांना केवळ “योगायोग” असे म्हणणे बरोबर नाही.

पूज्य बाबांशी, साधन, प्रपंच, व्यक्तिगत, व्यवसाय,वगैरे बर्‍याच बाबतीत बोलणे झाले. प्रत्यक्ष वन टू वन असेही काही वेळा बोलणे झाले. त्यातील काही गोष्टी येथे देत आहे. वाचकांनी त्यातून मला बाजुला काढावे व पूज्य बाबांनी काय सांगितले आहे तेवढेच पहावे, कारण पूज्य बाबांच्या संपर्कात आलेल्या अनेकांचे अनुभव थोड्या फार फरकाने असेच असतील.

आम्ही तिघेही (मी, पत्नी व मुलगा) पूज्य बाबांच्याकडे अनेकदा जायचो. यावेळी मात्र मी पूज्य बाबांकडे एकटाच काही ठरवून गेलो होतो. थोडे बोलणे झाल्यावर मी पूज्य बाबांना विचारले, “आपणास श्री महाराज काय म्हणायचे?” त्यावर ते न समजल्यासारखे दाखवून म्हणाले, “मी महाराजच म्हणायचो” त्यावर मी त्यांना म्हणालो, “नाही नाही, तसे नाही. “श्री महाराज तुम्हाला काय म्हणायचे किंवा तुमचा उल्लेख कसा करायचे?” त्यावर ते म्हणाले, “तुम्ही असे का विचारताय?” मी त्यांना कारण सांगितल्यावर पूज्य बाबा म्हणाले, “श्री महाराज मला केशवराव म्हणायचे.” पुढे बराच वेळ पू. बाबा माझ्याशी बोलत होते. व त्यांनी त्यासंदर्भात ज्या गोष्टी सांगितल्या त्या अशा:—
१. काही दिवसापूर्वी बोरिवलीच्या एक अनोळखी बाई “केशवराव कुठे राहतात?” असे विचारीत आल्या होत्या. त्यांना काही प्रश्न होते. त्यांची उत्तरे मिळाल्यावर त्या गेल्या.
२. श्री. महाराज अनेकदा “केशवराव कुठे आहेत त्यांना बोलवा.” असे म्हणून मला बोलवून घ्यायचे.
३. श्री. महाराजांना इतरांनी शंका विचारल्यास, “आज नाम घ्यायला त्यावाचून काही अडले आहे का?” असे विचारायचे. मी त्यांना काही विचारतांना, “आपण सांगाल का?” किंवा “आपण सांगावं” असं म्हणायचो. मला सगळं सांगायचे. आपल्या गुरूंशी कसं बोलावं हे समजलं पाहिजे.
४. श्री. गणपतराव दामले मला म्हणायचे, “तुम्ही फार भाग्यवान आहात, श्री महाराजांच्या तोंडी सारखे तुमचे नाव असते.”
५.श्री. तात्यासाहेब मला म्हणाले, “माझ्या नंतर श्री. महाराजांचे जास्त श्रवण तुम्ही केले.”
६. त्यानंतर त्यासंदर्भात श्री महाराजांना आपण रिपोर्टिंग करायचे हा विषय निघाला असता पूज्य बाबा म्हणाले, “तुम्ही हे रिपोर्टिंग चालू ठेवा. अगदी बारिक-सारीक गोष्टी महाराजांना सांगा. लहान मुलगा शाळेतून आल्यावर, शाळेत घडलेलं सगळं जसं आईला सांगतो त्यात कोणतीच अपेक्षा नसते. तसं तुम्ही प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगा. हे एक अनुसंधानच आहे. तुम्हाला त्यांचे शब्द ऐकायला येतील. त्यांना सगुणात येणं भाग पडेल.”

मालाड येथे रविवारी सकाळी ९ ते १० प्रवचन व नंतर आरती झाल्यावर पू. बाबा थोडावेळ प्रवचनाला आलेल्या लोकांशी बोलायचे. त्यात मी ही त्यांच्याशी, सुरवातीच्या काही दिवसात बोलू लागलो. पू. बाबांच्या ज्ञानापुढे, माझे प्रश्न साधे, क्षुल्लक, अज्ञानयुक्त असतं. अशा प्रश्नांनाही पू. बाबांनी न रागावता मनापासून उत्तरे दिली. आज काही काही प्रश्नांच्या बाबतीत, “मी हे प्रश्न पू. बाबांना का विचारले ?” असं वाटून खजिल व्हायला होते. परंतु काही प्रश्नांच्या बाबतीत असे वाटते की हे प्रश्न पू. बाबांनी माझ्याकडून विचारुन घेतले. माझ्याही नकळत.

मी एकदा पू. बाबांना विचारले, “नोकरी ही भीक कशी आहे? आपण त्यांना आपले काम देत असतो.” त्यावर पू. बाबा म्हणाले, “नोकरीत एक तारखेला पगार मिळावा ही अपेक्षा असतेच ना? ती भीकच आहे.” त्यावर मी त्यांना पुढे विचारले, “मग जे व्यवसाय, प्रॅक्टीस करतात, उदा॰ वकील, डॉक्टर यांच्या बाबतीत काय म्हणायचे?”  तेव्हा पू. बाबा म्हणाले, “आपल्याकडे आशिल यावा, पेशंट यावा, आपल्याला अमुक एक पैसा मिळावा ही अपेक्षा असतेच ना? मग तीही भीकच आहे. कोण सर्वस्वी रामावर भार टाकून बसला आहे? झाली तर प्रॅक्टीस नाहीतर नाही. तोपर्यंत सगळी भीकच आहे.” त्यानंतर पू. बाबांनी “राम इच्छा” म्हणणार्‍या कोष्ट्याची गोष्ट सांगितली व म्हणाले, “तशी अवस्था असेल तर नोकरी, व्यवसाय, प्रॅक्टीस भीक नाही.”

या प्रसंगानंतर – मी एका प्रसिद्ध कंपनीत साध्या नोकरीत होतो. १३ वर्षे नोकरी झाली होती. मी पूज्य बाबांना मार्च १९८६ मधे “नोकरी सोडू का?” असे विचारले. त्यावर त्यांनी मला एक वर्ष थांबायला सांगितले. मी परत मार्च १९८७ मधे पूज्य बाबांना “नोकरी सोडू का? १ वर्ष झाले.” असे सांगितले. त्यावर पूज्य बाबा असे म्हणाले, “एक वर्ष पटकन गेले. या बजेटचे काय परिणाम होतात ते बघू. अजून तीन महिने थांबा.” आता मी ठरवले परत पू. बाबांना विचारायचे नाही. वेळ तीन महिन्यावर आली होती. ७ जून १९८७ ला आम्ही तिघेही (मी, पत्नी, मुलगा) नेहेमीप्रमाणे सहजच पू. बाबांकडे गेलो होतो.थोडे इतर विषय झाल्यावर पू. बाबांनी मला विचारले, “तुम्ही तो राजीनामा देणार होतात तो दिला का?” मी म्हटले, “तुम्ही तीन महिने थांबा असे म्हणाला होता.” त्यावर पू. बाबा म्हणाले, “उद्या द्यावा”. मी दुसर्‍या दिवशी ८ जून १९८७ ला लगेच राजीनामा दिला. त्यांचे ऐकण्याची बुद्धी व शक्ती त्यांनीच दिली. आज सर्व गोष्टी खर्‍या असूनही स्वप्नवत वाटतात.

पूज्य बाबांनी माझी जबाबदारी घेतल्यासारखे झाले होते. नव्हे ती जबाबदारी त्यांनी घेतलीच होती. नोकरी सोडल्यावर पू. बाबा मला कायम विचारत असत, “बरे चालले आहे ना? प्रपंचाला काही कमी पडत नाही ना? मी, ” होय कमी पडत नाही.” असे म्हणायचो. दर ८-१० महिन्यांनी पू. बाबांचा हा प्रश्न ठरलेला व माझे उत्तर ठरलेले असायचे. माझ्या पत्नीलाही ते “बरे चालले आहे ना?” असे विचारायचे. १९९५ साली असेच वरील संभाषण झाल्यावर पू. बाबा म्हणाले, “तुम्हाला असे वाटते का की, व्यवसायात नोकरीपेक्षा जास्त पैसा मिळतो तर तसे नाही. प्रारब्धात असेल तेवढाच पैसा मिळतो. बरेचदा पू. बाबांशी बोलतांना त्या वेळी त्यांना काय म्हणायचे आहे ते कळत नसे. घरी गेल्यावर विचारचक्र सुरू होई.

मी व माझा मित्र त्या कंपनीत एकाच दिवशी (२०-१२-१९७२) लागलो होतो. त्याचे वडील दर रविवारी कुर्ला येथून पू. बाबांच्या प्रवचनाला येत असत. तो अजून नोकरीत होता. मी त्याला फोनवर विचारल, “तुला एक नाजुक प्रश्न विचारु का? तुझी आजची वार्षिक प्राप्ती किती?” त्याचे उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले. त्याची व माझी प्राप्ती एकच होती.

मार्च १९८६ ते जुलै १९८७ या सव्वा वर्षाच्या काळात पू. बाबांनी मला नोकरी सोडू दिली नाही व त्यायोगे अनेक गोष्टी शिकविल्या. पू. बाबांनी काही जणांना नोकरी ‘सोडू नका’ सांगितले होते तर काहींना ‘सोडा’ असे सांगितले, जसे मला सांगितले. त्यांचे ऐकून सर्वांचे उत्तमच झाले. ज्यांना नोकरी सोडू नका सांगितले होते ते सर्व आज निवृत्त आहेत.

आम्हाला तिघांना सख्यभक्ती फार आवडते. पू. बाबांनी ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे त्याला योग्य गोष्टी सांगून साधन करण्यास सांगितले. सकाळी किती वाजता उठावे हे सुद्धा व्यक्तिनुसार, व्यक्तिस्वभावानुसार, त्याच्या नोकरी-व्यवसायानुसार सांगितले.

आमचे कुटुंब फार भाग्यवान आहे असे मी समजतो. आम्ही पू. बाबांच्या सहवासासाठी फार आतूर होतो. उत्सुक होतो. (आधाशी होतो म्हणा ना!)

मी काही महिने रोज सकाळी मालाडला श्री महाराजांकडे जपासाठी जात असे. जप झाल्यावर पू. बाबांना नमस्कार करून घरी जात असे. श्री बावकर गुरुवारी मठात व पू. बाबांकडे येत असत. गुरुवारी आम्ही दोघेही पू बाबांकडे जाऊ लागलो. पू. बाबा आम्हाला महाराजांच्या गोष्टी सांगू लागले. हे कळल्यावर माझी पत्नी, डॉक्टर देशपांडे, व सौ. देशपांडे वहिनी येऊ लागल्या. पुढे ही श्रोत्यांची संख्या वाढत जाऊन १५ ते १७ पर्यंत गेली. वेळ सकाळी साधारण ८ ते ९ असायची. सुट्टिचा दिवस नसताना सकाळी एवढे लोक घरी असल्यावर केवढी गैरसोय असणार! मुलींना आटपून जायचे असायचे. सकाळी आटपायची घाई असणारच. आम्ही सर्व श्री. श्रीपाद दादा, सौ. शोभना वहीनी, वैजू, कल्याणी, मीरा यांचे फार फार आभारी आहोत.

पू. बाबांची दर रविवारची प्रवचने, गुरुपौर्णिमेच्या उत्सवातील प्रवचने, कार्तिक महिन्यातील काकड्याची प्रवचने, आम्ही चुकविली नाहीत. त्यांच्या बरोबर गोंदवल्यास व हेब्बळीला जायला मिळालं आणि तिथली प्रवचनेही ऐकायला मिळाली. इतके असूनही गोंदवल्यात संध्याकाळी त्यांच्या खोलीत गर्दीत आम्ही असायचो.

या सर्वाहून अधिक म्हणजे पू. बाबांची नामामृतधारा ही दुपारी मालाडला मोजक्या १५-२० श्रोत्यांसमोर झालेली ३ प्रवचने तीन दिवस प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली. दुपारी २ ते ३ वेळ असावी वाटते. आम्ही दुपारी जेवून प्रवचनाला गेलो होतो. ते तीन दिवस सोडुन पू. बाबांनी दुपारच्या वेळेत प्रवचने केल्याचे ऐकलेले नाही. साधनाच्या दृष्टीने ही प्रवचने फारच उपयोगी आहेत.

पू. बाबा कुणाच्याही घरी न जाता प्रत्येकाला घरच्यासारखे (वडील/आजोबा) होते. आमच्या (आणि प्रत्येकाच्या) घरातील बारीकशी गोष्टही त्यांच्या लक्षात असायची व त्याचे आम्हाला आश्चर्य वाटायचे. त्यांना कोणत्या गोष्टीची माहिती नव्हती असे नव्हतेच. ते ज्ञानी असूनही त्यांच्याकडे नम्रता, अमानित्व होते. ते खूप प्रेमळ होते. आपल्या माणसांच्या बारीकशा गोष्टींचे, बायकांनी केलेल्या पदार्थांचे कौतुक होते. पण साधनाच्या बाबतीत कठोर होते. ज्या दिवशी जप झाला नसेल त्याच दिवशी “आजचा जप झाला का?” असे पण प्रेमानेच, विचारायचे व आपण खजिल व्हायचो. स्वतःकडे गुरुत्व घेतले नाही. पाद्यपूजा नाही, गळ्यात हार नाही, कुणाला अनुग्रह नाही. सगळ्यांनी गोंदवल्याला अनुग्रह घ्यायचा. बरं सगळ्यांना गोंदवल्याचा श्री महाराजांचा अनुग्रह नाही, काहींना गडावर समर्थांचा (श्री. रामदास स्वामी) काहींना ज्ञानेश्वर माऊलींचा अनुग्रह घेण्यास सांगितले.

पूज्य बाबांविषयी काय आणि किती लिहू असे होऊन जाते. ते आमच्यासाठी कोण आहेत, काय आहेत हे शब्दात सांगणे कठीण आहे. ते क्षितीजासारखे होते व आहेत. त्यांचा थांग लागणे कठीण आहे. पू. बाबांच्या आठवणी किती सांगाव्या? त्यांच्या आठवणीत आम्ही विरघळून जातो. श्री. ज्ञानेश्वर महाराज श्री. निवृत्तीनाथांविषयी लिहिताना जसे भारावून लिहितात, तसेच काहीसे आमचे पूज्य बाबांविषयी लिहिताना किंवा बोलताना होईल असे वाटते.

पूज्य बाबांना असे म्हणावेसे वाटते:—

जे मागितले ते दिलेत, न मागितले तेहि दिलेत।
केलीत सगळ्याची पूर्तता, करीतो व्यक्त कृतज्ञता।।१।।

दिलेत महाराज, दिलेत नाम, दिलेत अनंत विचार।
आणि सांगितलेत जीवन शिका, करून विचार सारासार।।२।।

आलो नाही दरवेळी, मनांत काही हेतू धरून।
नाही गेलो रिक्त हस्ते, कधीच तुमच्या घरून।।३।।

अपात्र आम्ही असूनही, केलेत उदंड प्रेम।
क्षणोक्षणी तुमच्या मनी, अमुचा योगक्षेम ।।४।।

दर दिवशी सांजवेळी, होते जेव्हा दिवेलागणी।
दाटून येती मनोमनी, असंख्य तुमच्या आठवणी।।५।।

खऱ्या गुरूंना जाणे नाही, शिष्य खरा रडत नाही।
सारे मला माहित आहे, पण सगुण रूप स्मरत आहे।।६।।

निवृत्तीनाथही रडले होते, तेथे आमची काय कथा।
इतरांना कळणार कशी, आमच्या मनातील व्यथा।।७।।

–  श्री. हेमंत विद्वांस (मुंबई)

About the Author

Leave a Reply