आदरांजली
भावांजली
🌷श्री विष्णुपुत्र तू केशवा
सरस्वतीच्या लाघवा
नमस्कारीतो गुरुरावा
साचभावे…
🌷तू ज्ञानाचे भांडार
गुरोपदेशाचे सार
तू नामाचा जागर
निरंतर…
🌷तू गुरुआज्ञेचा आहेव
विकल्पास नसे वाव
हद्दपार जिथे माव
तेचि तूच…
🌷अमानित्वाची तू खूण
नको ग्रंथांची चाळण
नको भ्रमंतीचा शीण
तुज देखता…
🌷रूप तुझे देखणे
सर्वांगाने लोभसवाणे
तयांत पूर्ण भक्तिचे लेणे
शोभे तुजला…
🌷तुझिया वाणीचा गोडवा
नायनिष्ठेचा गारवा
अंशात्मक तरी यावा
मजअंगी…
🌷तुझी नम्रता वाखाणावी
का ज्ञानाची पूजा करावी
का नामाची रसना घ्यावी
न कळे मला…
🌷सद्शिष्य श्रीमहाराजांचा
आदर्श सकल साधकांचा
मार्ग दाविला तू साचा
आत्मपदाचा…
🌷ज्ञानेश्वरीचा तू उपासक
ब्रम्हचैतन्यांचा सूसेवक
सुखाचा परमार्थ नेमक
बोधिला जना…
🌷आनंदाचे तू निधान
गोंदवल्याचे तू चैतन्य
रामनामाचे सूक्ष्म निशाण
रोविले जनी…
🌷जरी देह झाला पीडित
ज्ञानयज्ञ चाले अखंडित
साधकांचे हे पूर्वसंचित
कळो आले…
🌷मी रजतमाचा महामेरू
आलस्याचा आगरू
कसा सांग मी सावरू
तुजविण…
🌷कैसा एकांत जपावा
कैसा लोकांत सांभाळावा
व्यवहार तो कैसा व्हावा
न कळे मजला…
🌷दृष्याचे हे दृढ बंधन
सहा रिपुंचे वेष्टन
अहंकाराचे आसुरी धन
मन सोडवेना…
🌷ध्येय माझे मुळी ठरेना
निश्चय मतिचा होईना
अंतर्मुखता मानवेना
काही केल्या…
🌷प्रपंचासक्तीचा मी बळी
कैसी पाठी लागली खेळी
सूत्रधार विसरे सर्वकाळी
उघडपणे…
🌷सूत्रधाराचा आठव यावा
त्याला कधी न विसरावा
तो ऱ्हुदयी प्रकटावा
ऐसे वाटे…
🌷या लागी एकचि आधार
गुरुप्रेम अपरंपार
त्यातचि नामाचे सार
असतचि आहे…
🌷तुझे गुरुप्रेम पाहोनी
दाटे कंठ नीर नयनी
तसे प्रेम भरभरोनि
मजला यावे…
🌷गुरूला कधी न विसरावे
अस्तित्व अखंड लाभावे
मार्ग ऋमिता गवसावे
समाधान…
🌷ही एकमेव उरी आस
दयावंता पुरवाल खास
आहे मजसि विश्वास
अंतर्यामी…
🌷म्हणोनी आलो तुझिया दारी
हाती घेवोनी कटोरी
कृपा करावी मजवरी
ते प्रेम देवोनी…
– बा. वा. काशीकर (विरार)