Daily Archives: October 17, 2018

गुरुप्रेम

गुरुप्रेम

।। श्रीराम जयराम जयजय राम ।।

प.पू.बेलसरे बाबा यांचे गोंदावले येथील प्रवचनातील कायमस्वरुपी, श्रोता म्हणजे श्री. कै. गोविंद राजाराम जोशी सर, म्हसवड. अर्थात आमचे ‘भाऊ’….

पू.बाबांचे आणि भाऊंचे नाते हे फक्त मनाचे होते. कधी कधी बाबांच्या खोलीवर जाऊन, साधनेतील शंका विचारणे आणि नमस्कार करुन येणे येवढेच.

भाऊंचा जन्म गोंदावल्याचाच आणि तो ही समाधीमंदिर परिसरातीलच. त्यामुळे बालपणीच “नामामृत” मिळाले आणि महाराजच ‘सर्वेसर्वा’ हा ठसा, मनामधे उमटला गेला. महाराजांबद्दल अतीव श्रध्दा व प्रेम. या श्रध्देचे रुपांतर भक्तीमधे होऊन शेवटच्या श्वासागणिक नाम मुरले ते केवळ पू. बाबांच्या प्रवचनांमुळे. वेळोवेळी केलेल्या साधनेतील शंकासमाधानामुळे.

भाऊंनी, ९ वीत असल्यापासून पू.बाबांची प्रवचने ऐकायला सुरुवात केली ते अखेरपर्यत. म्हणजे २०१५ तील उत्सवापर्यंत .शेवटी शेवटी त्यांना प्रवचनाला जायला त्रास होत होता, कारण आमचे घर गावामधे आहे. चालताना त्रास व्हायचा, कमी दिसायचे. तरीही पू.बाबांचे प्रवचन ऐकायला जायचेच, असा हट्टच आसायचा . प्रवचन न ऐकणे म्हणजे फार मोठा अपराध होण्यसारखे त्यांना वाटायचे. पू.बाबांवर त्यांनी मनापासून खूप प्रेम केले होते.

‘साधनेमधे थोडी कठोरता पाहिजेच’, ही पू.बाबांची शिकवण, ते तंतोतंत पाळत होते. त्यामुळे जीवाचे फार लाड करायचे नाहीत. शारीरिक व्याधी भरपूर होत्या. तरी देहदुःख ते सुख मानावे आणि सतत सत्संगतीत रहावे आणि अखंड अनुसंधान जपावे, हे सर्व भाऊ पू. बांबाच्या साहित्यातून , प्रवचनातून शिकले.

भाऊंनी ” हाची निरोप गुरुंचा” हे पू.बाबा लिखीत काव्य स्वत:मध्ये पुरेपूर उतरवले होते. असा एखादा शिष्य घडतोय हे पाहून, श्री महाराज आणि पू,बाबांही आनंदितच झाले असतील ह्यात तिळमात्रही शंका नाही.

पू.बाबांच्या प्रवचनातील बऱ्याच गोष्टी ते आम्हाला सांगायचे. त्या सांगताना पू.बाबांबद्दलचा असलेला अभिमान ,आदर व प्रेम अगदी ओसंडून वाहात असायचे.

भाऊंची नामसाधना जसजशी वाढत जात होती ,तसतसा त्याच्या मधे बदल होत होता. पू.बाबांनी साहीत्यातून केलेले मार्गदर्शन याचे चिंतन- मनन करुन , ते स्वत:मध्ये उतरवत होते , कृतीत आणत होते.

“प्रेमात राम रमतो ,प्रेमाला मोल ना जगामाजी “….
संपूर्ण आयुष्यभर भाऊंनी महारांजांच्यावर अतोनात प्रेम केले. सकाळी उठल्यावर १५/२० मिनीटे नुसते त्यांच्या फोटोकडे पाहात असायचे. पू.बाबांनी सांगितल्याप्रमाणे, गुरुंना जे जे आवडते ते आपण करावे, त्यानुसार भाऊ वागायचे. म्हणजे, अगदी महाराजांना काळा रंग आवडत नाही तर आपण कधीही काळे कपडे वापरत नसंत. महाराजांना लसूण आवडत नसे म्हणून शक्यतो आपणही खात नसंत…

व्यवहारातील सर्व भोग भोगताना नामस्मरणात राहून कुठेही न गुंतणे , ही पू.बाबांची शिकवण त्यांनी खरी करुन दाखविली . त्याची रोख पावती म्हणजे ,त्यांच्या दहाव्याला पिंडाला एका सेकंदात शिवलेला कावळा.

असे हे पू. बाबांच्या तालमीत तयार झालेले नामाच्या सुगंधाने सुगंधीत झालेले पुष्प दि.१४ मे २०१६ रोजी पहाटे श्री.सदगुरुचरणी लीन झाले..

सरोज ठोमरे.