गुरुभेट
।। श्रीराम ।।
२० मार्च, २०१८
साधारणपणे १९८० ते १९८२ च्या दरम्यान मला आतून प्रेरणा झाली की, प्रो. ती. केशव विष्णु बेलसरे यांना भेटावे. मी त्यांची पुस्तके वाचत होते. विशेषतः पूज्य श्री. महाराजांचे चरित्र. माझ्या अॉफिसमधल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मला दर रविवारच्या मालाडला होणाऱ्या प्रवचनांविषयी सांगितले. मी मनाशी ठरविले की, प्रवचन एकदा तरी ऐकायचेच! मला असेही समजले होते की, आपल्याला काही प्रश्न पडले असतील, तर त्यांची उत्तरेही त्या प्रवचनांतून मिळतात. अर्थात परीक्षा म्हणून नाही, पण genuinely, मी काही प्रश्न मनांत ठेवून प्रवचनाला येत गेले व मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. त्यानंतर एक दृढ विश्र्वास मनात निर्माण झाला. व मी नियमितपणे दर रविवारी प्रवचनाला येऊ लागले. कधी कधी अगदी शेवटी उभे रहायला लागायचे. पण एकच निष्ठा की प्रवचन ऐकायचेच. माझ्या संकोची स्वभावामुळे, मी दूर उभी राहून प्रवचन संपल्यानंतर इतरांचे प्रश्न व त्यांची उत्तरे प्रोफेसर साहेबांकडून ऐकायचे. पण हळूहळू अशीच पाच-सात वर्षे गेली. व मी ही धिटाईने प्रोफेसर साहेबांना प्रश्न विचारू लागले. मग माझ्या लक्षात आले की आपण ज्यांना प्रश्न विचारतो ते नुसते प्रोफेसर नाहीत तर पूज्य श्री. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य / अनुयायी आहेत. व सर्व साधक लोक त्यांना ‘बाबा’ म्हणतात. मग मी ही ती. बाबांना प्रश्न विचारू लागले. मला आठवते एकदा प्रवचन झाल्यावर मी ती. बाबांना म्हणाले, “ बाबा, आज खूप आनंदाचे डोही आनंद तरंग झाले. खरंच, ज्ञानेश्र्वरी इतकी सुंदर व आनंद देणारी आहे. केवळ तुमच्यामुळे! नाहीतर मी घाबरत होते.” त्यावर ते मला म्हणाले, “ तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा- मूळ ज्ञानेश्वरी वाचा. वाचत जा!” हे त्यांनी एकदा नाही अनेकदा मला सांगितले. तसेच, एकदा मी त्यांना नमस्कार केला व त्यांच्या तोंडून शब्द आले, “ नामांत आहेस – नामातच रहा!” मी क्षणभर भांबावले की ती. बाबांना कसे कळले की मी नामस्मरण करते ते!
ती. बाबा एक पारमार्थिक उच्चाधिकारी आहेत ह्याची प्रचिती पदोपदी येत होती. ती. बाबांचे मृदु गोड बोलणे पण त्याचबरोबर ठामपणे नामाविषयी, पारमार्थिक गोष्टींबद्दल बोलणे व त्यामागचा त्यांचा अभ्यास व साधना दिसत होती. कुठलाही बडेजाव नाही. अत्यंत निगवी साधेपणा. आम्ही नमस्कार केला, की ते पटकन् हात जोडत. नम्रपणा ! श्री. गोंदवलेकर महाराजांचे परमभक्त. मला तर ते ‘Messenger of Maharaj’ चं वाटत. मी स्वतः काही खूप हुशार नाही की माझा तत्वज्ञानाचा अभ्यास नाही. पण ती. बाबांमुळे हा अभ्यास करण्याची इच्छा होते. पण एक ठामपणे वाटते की, त्यांच्यासारखे साधन तरी आमच्या हातून व्हावे. तत्वज्ञानाचा अभ्यास ही एक गोष्ट. पण साधन होणे हे महत्त्वाचे! जे ती. बाबांनी प्रवचनांतून, वारंवार आमच्या मनावर ठसविले. मला स्वतःला असे वाटते की ती. बाबांनी आम्हाला “विचार” कसा करावा हे शिकवले. जे आताच्या शिक्षण पद्धतीत शिकवले जात नाही. त्यामुळे, जीवनातले बरेचसे प्रश्र्न, प्रश्र्न न राहाता, त्यांची उत्तरे सहज मिळत गेली. कधी कधी असे स्वस्थ बसले असताजाणवते, की ती. बाबांचे आमच्यावर किती उपकार आहेत. त्यांनी आम्हाला नामाविषयी खूप भरभरून सांगितले व साधा सरळ परमार्थ काय ? हे सांगितले. अर्थात, देहाने जरी ती. बाबा आता नसले तरी त्यांची ग्रंथसंपदा ही आमची गुरुभेट ! ते आमचे गुरु आहेत.
ती. बाबांचे देहावसान झाले त्या दिवशी आम्ही नातेवाईकांसोबत अश्रू भरल्या डोळ्यांनी मठात आलो. श्री. महाराजांच्या समोर त्यांना ठेवले होते. दुःखदायक घटना होती. पण त्या ठिकाणी एक पवित्रपणा जाणवत होता. व हलकासा चंदनाचा सुगंध जाणवत होता. आतून जाणवत होते की ह्या पवित्र देहातील आत्मा अनेक वर्षे नामसाधना करीत असे. . हा एक सुखदायक अनुभव होता. परमार्थातला उच्चकोटीचा अनुभव होता. जाता जाता बाबांनी संदेश दिला की नामस्मरणाने काय किमया घडू शकते.
लौकिक दृष्ट्या ती. बाबांचे कुटुंब म्हणजे त्यांच्या सौ. पत्नी, चिरंजीव व सूनबाई आणि त्यांच्या गोड नाती. पण ज्ञानेश्वरी सांगता सांगता, नामस्मरण करता करता ती. बाबांचे कुटुंब विस्तारत गेले. जणू काही “हे विश्वचि माझे घर” अशा तऱ्हेने ती. बाबा विस्तारीत कुटुंबाचे नकळत कुटुंब प्रमुख बनून गेले.
अशा अनेक आठवणी आहेत परंतु ह्या प्रातिनिधीक स्वरुपातल्या आहेत. ती. बाबांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. पण त्यातील महत्वाचा पैलू म्हणजे नामाबद्दलचे प्रेम व साधना! सर्व साधारण माणसाला समजेल अशा भाषेत परमार्थ समजावून सांगणारे एक थोर चिंतक, तत्वज्ञ, साधक ! माझे ती. बाबांना नमस्कार !
– सौ. कल्याणी. गि. पंडित (मीरारोड – पू)