Daily Archives: March 16, 2018

माझे मनोगत

माझे मनोगत

ती. बाबांना प्रमोदिनीचा साष्टांग नमस्कार.

बाबा, माझ्या लग्नानंतर आपण मला ६.११.१९८० रोजी, एक पत्र लिहिले होते. त्यानंतर आपली कधी कधी प्रत्यक्ष भेटही झाली. पण नेहमी प्रपंचाविषयी बोलणे व्हायचे आणि पत्राविषयी नाही. म्हणूनच आज मी हे लिहीत आहे.

लग्नापूर्वी आपला प्रत्यक्ष सहवास मला बरीच वर्षे लाभला. आपण मला सर्वतोपरी मार्गदर्शन केले , खूप शिकवले. “नामाचा अभ्यास वाढवावा, त्यानेच जीवनात समाधान मिळते.” असे आपले सांगणे असे. पण बाबा नामाचा अभ्यास वाढविणे मला जमले नाही, हे मनापासून कबूल करते. त्याबद्दल क्षमा असावी. याचे वाईट वाटत आहे. यापुढे मी नक्की प्रयत्न करीन.

प्रत्यक्ष नसला, तरी मानसिक पातळीवरचा आपला सहवास मला कायम आहेच. रा. श्रीपाद दादा आणि सौ. शोभना वहिनी , यांचेही मला मार्गदर्शन असते. बाकी सर्व व्यवस्थित आहे.

–  आपली, प्रमोदिनी दाते. ( सौ. नीति मुकुंद गद्रे. )

“मला माझ्या गुरूंची आज्ञा आहे.”

“मला माझ्या गुरूंची आज्ञा आहे.”

इ.स. १९८५ मधे बाबांना खूप ताप आला. छाती कफाने भरली होती. बोलताना धाप लागत होती. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांची रक्त तपासणी करण्यासाठी मला संधी देण्यात आली होती. त्यांच्या रक्ताचा नमूना बाटलीत काढून घेतल्यानंतर मला राहवेना. म्हणून मी म्हटलं, “बाबा, तुम्हाला खूप त्रास होतोय. केवढा ताप आणि अशक्तपणा आला आहे! या रविवारी निरुपणाचा त्रास न घेतलातर बरे होईल. विश्रांती नाही का घेणार?”

निरुपण न करता विश्रांती घेणे ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. अत्यंत अशक्तपणा आलेला असतानाही ते ताड्कन बिछान्यात उठून बसलेआणि ठासून शब्दा-शब्दावर जोर देत म्हणाले, “गुरुआज्ञा म्हणजे काय हे कळतं का तुम्हाला? माझ्या जिवात जीव असेपर्यंत, शेवटच्या श्र्वासापर्यंत मी निरुपण सोडणार नाही, माझ्या गुरुची मला आज्ञा आहे, समजलांत? “

हे बोलतानाही त्यांना धाप लागली होती, कपाळावर घाम आला होता, त्यांच्या डोळ्यांतील तेज मला सहन झालं नाही. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन मी घरी आले.खरोखरच बाबांनी आपला शब्द खरा केला. १९९७ च्या डिसेंबर महिन्यात श्री महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळी अक्षरशः बिछान्याला खिळलेले असतानाही त्यांनी निरुपणे केली. अखेरचा श्र्वास चालू असेपर्यंत नामाचे, ईश्र्वरभक्तीचे महत्व लोकांना सांगत राहिले. ही गुरुनिष्ठा आम्ही पाहिली. अंतःकरण गलबलून गेलं, अश्रू ही मुके झाले.

–  सौ. माधवी. श. कवीश्र्वर

शिदोरी

शिदोरी

“श्रीराम समर्थ”

ति. बाबा ( प्रो. के. वि. बेलसरे )

ज्या व्यक्तिमुळे आमचं जीवन जगण श्रीमंत, समृद्ध झाले त्यांच्याबद्दल लिहिणे कठीण आहे. प्रयत्न करते.

ति. बाबा हे श्री.महाराजांचे ( श्री.ब्रह्मचैतन्य गोंदावले महाराज) निष्ठावंत साधक, भक्त शिष्य. ते विनोदाने, “ मी महाराजांचा बोंबल्या आहे” असे म्हणत. यावरुन त्यांच्यातील लीनता, नम्रता दिसून येते.

श्री. महाराजांचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम होते. श्री. महाराजांचा निरोप सांगण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता असे वाटते.

श्री. महाराज हे नामावतार होते. सबंध आयुष्यभर ति. बाबांनी महाराजांचा निरोप महणजेच नामाचे महत्व, जे जे त्यांच्या संपर्कात आले त्यांना सांगितले. जगभरातून लोक त्यांना, आपल्या शंका विचारायला येत आणि समाधान पावून जात.

त्यांनी स्वतःच्या साधनमार्गातील अभ्यासापासून ते त्यांचे जवळील सर्व परमार्थ मार्गातील ज्ञान जगासाठी पुस्तकरुपाने ठेवले आहे. स्रर्व स्वानुभवाचे असल्यामुळे, “बोले तैसा चाले” ही उक्ती त्यांना चपलखपणे लागू पडते.

श्री. महाराजांची आज्ञा आली म्हणून त्यांनी प्रवचने केली. आणि ती आज्ञा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळली. ते आज्ञापालनाचा आदर्श होते.

अतिशय अभ्यासू वृत्तीमुळे, त्यांची प्रवचने म्हणजे अप्रतिम श्रवणकाळ असायचा. अध्यात्म शक्य तितक्या सोप्या शब्दांत सांगायचे. मधेच हलकासा विनोद आणि जगभरातील तत्वज्ञान्यांच्या विचारांचा असा अध्यात्मिक जगप्रवास असायचा. चार हजार ग्रंथ वाचले पण नामाला पर्याय नाही, हा श्री. महाराजांचा निरोप अत्यंत कळकळीने त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवला.

“परमार्थ म्हणजे काय ते या जन्मात समजून तरी घ्या.” असे ते नेहमी म्हणत.

“प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो”, हा श्री. महाराजांचा निरोप त्यांनी अतिशय प्रेमाने आणि स्वतः तसे अभ्यासपूर्ण जगून, सर्वांना समजेल अशा भाषेत लोकांपर्यंत पोहोचवला.

अत्यंत शांत, प्रेमळ पण ठाम, आणि प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व.
गाडी थंडावतेय. चला पेट्रोल भरुन यावं, अस म्हणून आम्ही ति. बाबांकडे जात होतो आणि पुढच्या भेटीपर्यंतची शक्तीची शिदोरी घेऊन येत होतो. आज आता ते देहात नाहीत पण त्यांची आठवण आली नाही असा दिवस गेला नाही. आणि त्यामुळे त्यांची आठवण आली की ते आपल्या जवळच आहेत असं वाटत आणि आम्ही निश्चिंत होतो. अशा उत्तुंग आणि हिमालया एवढ्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिताना शब्द तोकडेच आहेत.

ती. बाबांना माझा विनम्र प्रणाम.

–  सौ. मुग्धा पेंढारकर (ठाणे).

दंडवत

दंडवत

अथांगता ज्ञानाची हेच ज्यांच मूळ व्यक्तिमत्व ते अति सामान्यांच्या अति संकुचित व्रुत्तीत उतरवण्याची त्यांची

तळमळ जीवाला मोहिनी घालणारीच आहे……..

परमतत्वाकडे सतत धाव घेण्याची त्यांची आस व झेप व त्या धावपट्टीवर इतरांना(सामान्यांना) उतरवण्याची त्यांची शक्ती व त्यांनी केलेला अविरत प्रयत्न / अविरत प्रवास ह्या स्वर्गीय दिव्यते पायी मन नमलं नाही तरच नवल………..

अति भाग्यवंतांनाच हा सहवास ……प.पू. महाराजांच्या ह्या क्रुपा वर्षावाचा आनंद अभेद्य आहे……फक्त मन:पूर्वक नमन ! दंडवत…….

–  (उपाध्ये कन्या ) सौ सीमंतिनी ठकार…..

आशीर्वाद

आशीर्वाद

।। श्रीराम ।।

“आपले प.पू. बाबा “

मी प.पू बाबांना अगदी प्रथम कधी भेटले ते नेमकं आठवत नाही. खूपच लहान होते. माझे वडील कै. प्रा. प्र. म. उपाध्ये हे बाबांचे सिद्धार्थ कॉलेजमधले विद्यार्थी आणि बाबांचे ‘लाडके’ विद्यार्थी! आई-अण्णा (माझे वडील) आम्हा दोघी लहान बहिणींना घेऊन, बऱ्याच वेळी बाबांच्या घरी घेऊन जात. त्यावेळी बाबा म्हणजे कोण हे काहीच कळत नव्हतं. पण तिथे जायला खूप आवडायचे. कारणे मात्र मजेशीर होती. कारण प.पू. बाबा म्हणजे ते ‘अजोबा’ खूप प्रेमळ होते, तशाच आज्जी पण प्रेमळ! त्यांची नात ‘वैजयंती’ माझ्यापेक्षा लहान पण तिच्याबरोबर खेळायला मजा यायची. बाबांचे सुपुत्र म्हणजे श्रीपादकाका, शोभाकाकू खूप अगत्याने, प्रेमाने आमचे स्वागत करीत असत. आणि प्रत्येक वेळी, आज्जी आणि शोभाकाकू काहीतरी छान खाऊ म्हणजे लाडू, वड्या वगैरे पुढे ठेवत. त्याचही भलतच आकर्षक ! एकूण काय बाबांकडे म्हणजे एका खूप छान प्रेमळ अजोबांकडे जायचं हा आनंद अवर्णनीय असायचा.

हळूहळू काही गोष्टी वाढत्या वयानुसार समजायला लागल्या. मोठे मोठे उद्योगपती, डॉक्टर्स, प्रथितयश कलाकार प.पू. बाबांच्या पाया पडत. त्यांचे शब्द कानात प्राण आणून ऐकत. ते पाहिल्यावर ‘बाबा’ हे काहीतरी वेगळे रूप आहे, याची जाणीव होऊ लागली. माझ्या वडिलांचा महणजे ती. अण्णांचा आणि प.पू. बाबांचा संवाद बहुतेक वेळा अभ्यासासंदर्भात, तत्वज्ञान, संस्कृतबद्दल असे. पण त्या वयात तेवढी प्रगल्भता नव्हती, त्यामुळे ‘हे’ संवाद लिहून ठेवलेे नाहीत. बऱ्याच वेळा ती. अण्णांबरोबर प.पू बाबांकडे जायचे. आदरयुक्त भीतीने मी गप्पच असायचे. आम्ही निघालो की माझी विचारपूस करून, “या बरं बाळ ” म्हणायचे. ते शब्द अजूनही मनांत, कानात बसलेत! त्या “ या बरं बाळ “ मध्ये फार फार मोठे आशीर्वाद दडले होते, हे आता आता कळतयं.

प.पू. बाबांच्या आठवणी तशा बऱ्याच आहेत. पण त्यातली एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. माझी आई अचानक हार्ट attack ने गेली. त्यावेळी माझं वयं साधारणतः २५ असेल. आईने शेवटचा श्र्वास घेतला त्यावेळी तिचे नामःस्मरण चालू होते. मी तिच्या बाजूलाच बसले होते. ती अत्यंत समाधानात होती. इतक्या अचानक माझ्या डोळ्यादेखत ती गेली, याचा मला प्रचंड धक्का बसला. सर्वांनी सांगूनही, माझं दुःख काही कमी होईना! शेवटी, ती. अण्णा मला प.पू बाबांकडे घेऊन गेले. मी रडतच त्यांना नमस्कार केला. मला वाटलं, आता हे काहीतरी खूप मोठं अध्यात्म तत्वज्ञान सांगणार ! पण तसं काही न म्हणता, प.पू. बाबा पहिले वाक्य काय म्हणाले? “ बाळ ! तुला इतकं दुःख होणं नैसर्गिक, सहाजिक आहे बरं का ! शेवटी तुझी ‘आई ‘ होती ना!” का माहित नाही, या एकाच वाक्यानं इतका धीर आला, की मला ‘जे होतयं’ ते सहाजिक आहे. मग म्हणाले, “ आपलं आईवर इतकं प्रेम आहे, मग इतकं दुःख केल्यावर तिलाच वाईट वाटले ना? बघ, महाराज साधकाचा अंतकाळ कसा साधतात, हे तुला बघायला मिळालं. नामःस्मरण करताना आई गेली हे आपलं भाग्य आहे ना? तेंव्हा इतकं दुःख नको बरं !”

प.पू. बाबांचे हे शब्द म्हणजे जणू शक्तिपात! त्या क्षणापासून मी दुःख सावरुन पुनः उभी राहिले. त्यानंतर छोट्या मोठ्या प्रापंचिक अडचणींसाठी त्यांच्याकडे धावायचे. त्यांचा एखाद- दुसरा शब्द हा जणू साक्षात भगवंताचा आधार असायचा ! बाबांचा मिळालेला सहवास आणि मार्गदर्शन, ही माझ्या आयुष्यातील ‘कमाई’ आहे असं मी समजते. तर याच आधारावर, पुढील वाटचाल चालू आहे.

–  सौ.द्युती उपाध्ये केसकर.