परमपूज्य श्री केशव विष्णु बेलसरे म्हणजेच “ती. बाबा बेलसरे” हे, श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे, अलिकडच्या काळातील थोर शिष्य होऊन गेले.
जन्म व बालपण
बाबांचा जन्म ८ फेब्रुवारी १९०९ साली सिकंदराबाद येथे एका मराठी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील सुशिक्षित परंतु सनातनी वळणाचे होते. त्यांचे वडील डिस्ट्रिक्ट कोर्टात न्यायाधीश होते. घरामधले वातावरण कडक शिस्तीचे होते.
इतर गोष्टीमधे मुलांना धाक असला, तरी विद्या, कला, आणि ज्ञानसंपादनाला आडकाठी किंवा बंधने नव्हती. त्याकाळातील विविध विषयांवरची मराठी, संस्कृत आणि इंग्रजी पुस्तके व मासिके त्यांच्या घरी असत.
बाबांची शरीरयष्टी बारीक परंतु सशक्त होती. बुद्धी तल्लख व स्मरणशक्ती दांडगी होती. घरात असलेली सर्व पुस्तके लहानपणीच त्यांनी पुनःपुन्हा वाचून काढली होती. लहान असूनही श्रीमद्भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वरी, दासबोध अशा ग्रंथांची त्यांना ओढ होती. कादंबर्या, गोष्टीरुप कथा त्यांना फारशा आवडत नसत. गीतेचे ७०० श्लोक त्यांनी एका आठवड्यात पाठ केले होते.
बाबांना जन्म-मृत्यू आणि आत्म्याबद्दल कुतुहल वाटे आणि त्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून युद्धभूमीवर जावे आणि तेथे बघावे असे फार वाटे.
लहानपणी त्यांची गाठ, हैद्राबादचे संत ‘श्री. भटजीबापू’ यांच्याशी पडली. भटजीबापूंचे बाबांवर फार प्रेम होते. “बाळ, मोठा होऊन तू संत होशील !”, असे ते म्हणत.
तारुण्याची वर्षे
तारुण्याच्या सुरुवातीला बाबांच्या स्वभावात बदल होऊ लागला. त्यांचा स्वभाव रागीट, भावनाप्रधान आणि उतावीळ झाला.
घरातील परिस्थिती, सामाजिक उलाढाली, निजामशाहीचे वातावरण आणि सर्वात मुख्य म्हणजे देशभरात पेटलेल्या स्वातंत्र्यचळवळीचे त्यांच्या मनावर खोल परीणाम झाले. पुढे त्यांच्या प्रवचनातदेखील जुन्या आठवणींचा अनेकदा उल्लेख येत असे.
आपणही स्वातंत्र्यचळवळीत भाग घ्यावा, ब्रिटीश अधिकार्यांना मारून संपवावे असे त्यांना वाटे आणि काही क्रांतिकारी मित्रांबरोबर त्याबद्दल खलबते चालत. काही वर्षे या मार्गात गेल्यामुळे शिक्षण मागे पडले आणि त्यासाठी दोन वेळा घर सोडल्याने घरातले व समाजातले स्थान संपले. मोठ्या विलक्षण रितीने पण, त्यांच्या हातून कोणतीही अनुचित गोष्ट घडली नाही.
या चळवळीत सक्रीय झाल्याचा परिणाम म्हणून पण त्यांची तब्येत बिघडली आणि मेंदू शिणला. मन अस्थिर होऊन नकारात्मक विचारांचा त्रास होऊ लागला. तेव्हा दासबोधातील “जेही उदंड कष्ट केले। तेची भाग्य भोगून गेले।” या ओवीने त्यांचे मनपरिवर्तन झाले.
भरपूर अभ्यास करुन ज्ञानार्जन करावे असे त्यांच्या मनाने घेतले. बाबांचे वडील, आजोबा आणि आत्या नित्य जप व ध्यान करीत असत. त्यांचे पाहून आणि मनःशांतीसाठी बाबा अनेकदा “श्रीराम” किंवा ” ओम्” चा जप करीत. स्मशानात किंवा टेकडीवर एकटे बसून जप करणे त्यांना आवडे; आणि त्यांना कधी भीतीसुद्धा वाटत नसे.
असेच एकदा, मारुतीसमोर जपाला बसलेले असतांना, “तत्वज्ञानाचा अभ्यास करावा” असे स्पष्ट शब्द त्यांस ऐकू आले. त्या अंतःप्रेरणेच्या जोरावर, विज्ञान सोडून तत्वज्ञान हा विषय घेऊन पुढे अभ्यास करायचा निर्णय त्यांनी घेतला. घरातील ज्येष्ठ मंडळींचा विरोध पत्करुन ते मुंबईच्या एल्फिन्स्टन काॅलेजमध्ये तत्वज्ञान शिकण्यास आले.
पुढे क्रांतीबद्दल बोलतांना ते असे सांगत असत की, बाहेरील क्रांतीपेक्षा मनुष्याच्या आतील क्रांती ही खरी क्रांती होय. श्री कृष्णमूर्ती यांचे, “The only revolution is the inner revolution” हे वाक्य त्यांना फार आवडे; आणि ते पुन्हा-पुन्हा त्याचा उल्लेख करीत.
शिक्षण व व्यवसाय
बाबांच्या मनाची धाटणी स्वाभाविकच सूक्ष्म आणि अंतर्मुख असल्याने तत्वज्ञान हा विषय त्यांना खरोखर आवडला आणि त्याचा सखोल अभ्यास त्यांनी आरंभला.
बाबा कोणताही विषय नीट वाचून तो समजून घेत आणि लिहून काढीत. तो पूर्णपणे आत्मसात करुन त्यावर चिंतन व पुनर्विचार करीत.
त्यांचा विचार, मुळातच शुद्ध आणि तर्काला धरुन होता. त्यांना विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारी गोष्ट स्वाभाविकच पटत असे. तत्वज्ञानाचा अभ्यास करीत असतांना पडणार्या विविध प्रश्नांची कायमस्वरुपी उत्तरे मिळवण्यासाठी त्यांनी तत्वज्ञानाबरोबरच तर्कशास्र, मानसशास्र, शरीरशास्र, समाजशास्र, गणित, इतिहास, भूगोल, काव्य, नाट्य, विनोद, व अशा अनेक विषयांचा अभ्यास केला. भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करुन दोघांमधील साधर्म्य आणि विसंगती हे दोन्ही त्यांनी समजून घेतले.
त्यांचे हे ज्ञानार्जन जीवनाच्या अंतापर्यंत चालूच राहिले; आणि त्यामुळेच त्यांचे ज्ञान हे खर्या अर्थाने अथांग सागरासारखे होते. त्यांच्या ज्ञानाचा हा व्यासंग त्यांच्या प्रवचनांत अनुभवास येत असे.
त्यांची एकाग्रता आणि धारणाशक्ती पहिल्यापासूनच प्रचंड होती. स्मरणशक्ती देखील तीव्र असल्याने त्यांनी अभ्यासलेले विषय अथवा ग्रंथ, वर्षानुवर्षे त्यांना जसेच्या तसे लक्षात रहायचे. द्व्यावधानाची विज्ञा त्यांना अवगत होती.
कोठल्याही पुस्तकाची पाने सहज उलटून, बाबा, त्यांना हवे ते थोडक्या वेळात वाचीत असत. त्यांची पुस्तके, लिखाण इतकेच नव्हे तर त्यांचे टेबल देखील स्वच्छ, नीटनेटके आणि आयोजित असे. त्यांचे अक्षर अतिशय सुंदर, सुस्पष्ट, वळणदार आणि मोठे होते. त्यातून त्यांच्या विचारांची स्पष्टता व ज्ञानाची खोली प्रतीत होत असे.
जगामधे सर्व विषय, शास्रे, वाडःमय किंवा ज्ञान हे एकसत्य रुपाने एकमेकांशी जोडलेले किंबहुना एकच असतात. परंतु मानवी बुद्धीच्या सामर्थ्याने त्यांची सांगड घालून सामान्यांना समजावून देण्याचे महाकठीण काम त्यांनी लीलया पेलले.
असे असूनही सुरवातीला त्यांना नोकरी मिळण्यास कष्ट झाले. १० वर्षे दादरच्या बालमोहन विद्यालयामधे इंग्रजी भाषा शिकवल्यावर मग सिद्धार्थ काॅलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक (प्रोफेसर) म्हणून नियुक्ती झाली. तेथे तत्वज्ञान व तर्कशास्त्र हे विषय ते शिकवीत असत.
प्रत्येक वर्गाच्या आधी, ते, स्वतः वाचन व मनन अशी पूर्वतयारी करीत. त्यांचे वर्ग तुडुंब भरुन वाहात असत. त्यांचे ऐकण्यासाठी इतर काॅलेजचे विद्यार्थी देखील अनेकदा त्यांच्या वर्गाला येऊन बसायचे.
काॅलेजमधील सर्वसाधारण गडी ते प्राध्यापक या सर्वांनाच त्यांचा अत्यंत आदर होता. तसेच त्यांचे समकालीन, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य श्री. गुरूदेव रानडे, केंब्रिजचे प्रोफेसर सील या आणि अशा विचारवंताना बाबांच्या प्रखर बुद्धीमत्तेचे आणि ज्ञानाचे फार कौतुक होते, व त्यांच्यावर सर्वांचे विशेष प्रेम होते.
अध्यात्म व ज्ञानसाधना
सन १९३१ मधे म्हणजेच वयाच्या २१ व्या वर्षी बाबांची भेट श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी झाली.
पहिल्याच भेटीत श्री महाराजांनी बाबांना आपलेसे करुन घेतले, व “नेहमी येत जावे” असे सांगितले. श्रींना पुढचे कळते यामुळे आकर्षित झालेले बाबा देखील पहिल्या भेटिपासूनच श्रींचे झाले.
जीवन-मृत्युबद्दल कुतुहल असणार्या आणि अध्यात्माची मुळात आवड असणार्या बाबांच्या अंतःकरणात आणि त्या अनुशंघाने जीवनात श्रीमहाराजांमुळे क्रांती घडून आली आणि श्रीमहाराजांच्या मार्गदर्शनाखाली बाबांची खरी साधना सुरु झाली.
श्री महाराजांनी बाबांना खर्या अर्थाने ओळखले आणि घडवले. त्यांच्याच कृपेने बाबांना तत्वज्ञानाचा, जीवनाचा आणि परमार्थाचा खरा अर्थ कळला.
नामसाधना आणि सद्गुरुंचे आज्ञापालन हे बाबांच्या जीवनाचे ध्येय ठरले. श्रीमहाराजांनी दिलेले पवित्र नाम आणि त्यांची आज्ञा हे व्रत बाबांनी पुढे जन्मभर सांभाळले.
बाबांनी श्रीमहाराजांचेच सांगणे हे अंतीम सत्य मानले. महाराज म्हणत, “तत्वज्ञान जीवनातून निर्माण व्हावे, पुस्तकातून नाही”. त्यामुळे प्रत्यक्ष जीवनातून उगम पावलेले आणि श्रीं च्या सांगण्याला धरुन असलेले तत्वज्ञान तेवढेच खरे ही बाबांची खात्री होती. “अथातो ब्रम्हजिज्ञासा” ऐवजी “अथातो जीवनजिज्ञासा” हे जास्त योग्य आहे असे ते सांगत.
बाबांचे जीवन अत्यंत साधे परंतु शिस्तबद्ध होते. आपले शरीर आणि मन ते अतिशय स्वच्छ व पवित्र ठेवीत असत. त्यांचे कपडे साधे, स्वच्छ, पांढरे व सुती असत. त्यांचे खाणे सुद्धा मर्यादित आणि सात्विक असे. ते स्वतःशी अतिशय कठोर वागत. त्यांनी आपली साधना व अभ्यास याबाबतीत कसलीही तडजोड केली नाही व त्यासाठी कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. परंतु हे करतांना मात्र आपली व्यवहारातील व प्रापंचिक कर्तव्ये ते न चुकता करीत असत.
साधनात आपले सर्वस्व ओतल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही असे ते नेहमी सांगत, “Put your soul into it” हे त्यांचे शब्द होते.
श्रींची कृपा आणि स्वतःची अविरत साधना, यामुळे बाबांची पारमार्थिक प्रगति फार झपाट्याने झाली. बाबांनी आपल्या साधनेचा नव्हे जीवनाचाच वृतांत कोणताही आडपडदा न ठेवता खुल्या दिलाने व खरेपणाने “आनंदसाधना” या आत्मचरित्रात सांगितला आहे.
साधनेतील अडचणी, विविध टप्पे, अनुभव आणि एकूण साधनप्रवास यांचे ज्ञान बाबांनी सामान्य साधकांसाठी खुले केले. विचार, विवेक आणि गुरुभक्ती या तीन पायांवर पेलवलेली बाबांची “आनंदसाधना” सामान्य साधकास अंतःस्फूर्ती देणारी व मार्गदर्शक आहे.
त्यांची ही योग्यता ओळखूनच परमपूज्य श्रीगुरुदेव रानडे त्यांच्याबद्दल म्हणाले, “What a fine man he is !”
सामान्यजीवन
बाबांचे सामान्यजीवन हे अगदी इतरांसारखेच होते. प्रापंचिक अडचणी, व्यवहारातील खाचखळगे, जीवनातील चढउतार, यांना त्यांनी नेहमी शांतीने व धीराने तोंड दिले.
त्यांच्या पत्नी सौ. इंदिराबाई यांची प्रेमळ साथ त्यांना जन्मभर लाभली. बाबांप्रमाणेच त्यांनाही साध्या आणि सुसंस्कृत जीवनाची आवड होती. बाबांप्रमाणेच बुद्धीने तल्लख, पण सदाचरणी आणि लोकप्रिय अशा इंदिराबाई बाबांच्या पत्नी शोभत असत. श्रीमहाराजांवर निष्ठा आणि शक्य तितका जप सांभाळून त्या ही संसारातील सर्व कर्तव्ये पार पाडीत.
बाबांचे सुपुत्र श्री. श्रीपाद आणि त्यांच्या पत्नी सौ. शोभना यांचे आई-बाबांवर अतिशय प्रेम होते. आज्ञाधारकपणा व सेवाभाव हे गुण दोघांमधेही सारखेच! बाबांच्या साधनेस व लोककार्यास त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा हातभार लागला.
बाबांचा वरचा आविर्भाव गंभीर आणि कडक असला, तरीही त्यांचे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर विषेश प्रेम होते. संसारातील लहान-मोठे सर्व निर्णय ते नेहेमी श्रीमहाराजांच्या आज्ञेने घेत असत. श्रीमहाराजांना काय आवडेल किंवा आवडणार नाही याचे भान त्यांना नेहमी असे.
घरातल्या छोट्या-मोठ्या सर्व गोष्टींमधे बाबा जातीने लक्ष घालत. तसेच संसारातील कामे सुद्धा वेळ पडल्यास बाबा करीत. भाजी आणणे, नातींना शाळेत पोहोचवणे इत्यादी नित्यकर्मे तर ते स्वतःच करीत. तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीशी ते युक्त असा संवाद साधत.
कोणतेही काम नीटनेटके व सौंदर्यपूर्ण पद्धतीने करणे त्यांना आवडे. कोणत्याही अभिजात गोष्टीची त्यांना आवड होती. शास्त्रीय संगीत तर विशेष आवडे. अनेकदा संध्याकाळी, शास्त्रीय गायकांनी गायलेली भजने ते ऐकत. पण जरा मन सुरांमधे गुंतु लागले तर संगीत लगेच बंद करीत. जीवनातील सर्व कर्मे करतांना, सर्व अनुभव घेतांना, श्रीमहाराज आणि त्यांना अत्यंत प्रिय असे ‘नाम’ हे बाबांच्यासाठी सर्वोच्च होते.
जीवनकार्य
बाबांनी श्रीमहाराजांच्या आज्ञेवरुनच आपले सर्व कार्य केले. “ज्ञानेश्वरीचा वाचून अर्थ सांगावा” यापासून सुरुवात करुन पुढे प्रचंड अध्यात्मिक कार्य बाबांकडून श्रीमहाराजांनीच करुन घेतले.
श्रींच्या आज्ञेनुसार बाबांनी परमार्थावर प्रवचने केली. तसेच ५० पेक्षा जास्त पुस्तके लिहून परमार्थाची कल्पना स्पष्टपणे मांडली.
प्रचंड बुद्धिमत्ता, अफाट ज्ञान, सद्गुरुंवरचे खरेखुरे प्रेम, अनेक तपे केलेली साधना आणि गुरुआज्ञाप्रमाण वृत्ती या सद्गुणांचे अधिकारी असलेले बाबा या कार्यासाठीच जन्मास आले होते यात शंका नाही.
“लोकांना धीर द्यावा आणि त्यांना नामाला लावावे” ही श्रीमहाराजांची त्यांना अखेरची आज्ञा होती. त्यानुसार बाबांनी अक्षरशः लाखो लोकांना मार्गदर्शन करुन अध्यात्माकडे वळवले. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांचा बाबांनी खर्या अर्थाने उद्धार केला. त्यांना भेटण्यास येणार्या लोकांची सख्या फार मोठी होती. बाहेर नित्यव्यवहार आणि आंत अखंड अनुसंधान, असे बाबा साधकांना योग्य ते मार्गदर्शन करीत.
बाबांनी श्रीमहाराजांचे चरित्र, श्रीदासबोध, अध्यात्म दर्शन, उपनिषदांचा अभ्यास, भावार्थ भागवत, व बृहदारण्यक (तीन संवाद) असे मोठे ग्रंथ लिहीले. श्री ज्ञानेश्वरी, भागवत, योगवासिष्ठ, नारदभक्तीसूत्रे, चांगदेवपासष्ठी, या विषयावर ६० पेक्षा जास्त वर्षे प्रवचने केली.
त्यांच्या प्रवचनाला सुशिक्षित-अशिक्षित, शहरी-खेडुत, लहान-मोठी, स्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, तरुण-वृद्ध, अशी सर्व प्रकारची माणसे येत असत. परमार्थासारखा सूक्ष्म आणि अवघड विषय अतिसामान्य माणसाला कळेल, पटेल आणि तो नामाकडे वळेल असे त्यांचे सांगणे असे. आपल्या प्रवचनात अनेक उदाहरणे, इतिहासातील गोष्टी, मनोरंजक पण अर्थपूर्ण प्रसंग , वेळ पडल्यास विनोद हे सर्व सांगून ते विषय समजावून देत. त्यांचे सांगणे हे शाश्वत आणि सार्वत्रिक असल्याने कोणत्याही काळास, समाजास व परिस्थितीला योग्यच ठरते.
त्यांची विविध विषयांवरची पुस्तके ही केवळ भाष्य अथवा भाषांतर नसून श्रीमहाराजांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि स्वसाधनेतील अनुभव यांच्यावर आधारीत ज्ञानकोष आहेत.
उत्तरार्ध
बाबांच्या लहानपणी, श्री.भटजीबापू यांनी केलेले भाकीत खरे ठरले. बाबांनी पारमार्थिक उंची गाठली आणि ते महाराजांचे सद्शिष्य झाले. असे असुनही “मी आपल्यातलाच आहे” असे म्हणून आपली योग्यता आणि अनुभवश्रीमंती ते नेहमीच झाकून ठेवत. जीवनात वेगवेगळ्या भूमिका प्रेमाने व कर्तव्यनिष्ठेने निभावणारे ‘बाबा’ हे खरे पांढर्या कपड्यातील ‘संन्यासी’ होते.
श्रीमहाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ‘अमानित्वाचा’ अभ्यास केला. श्रीमहाराजांना अतिप्रिय असलेले ‘नाम’ शेवटच्या श्वासापर्यंत घेतले. ३ जानेवारी १९९८ रोजी बाबा अनंतात विलीन झाले.
जेथे ज्ञान असते तेथे भक्ती नसते|
जेथे भक्ती असते तेथे ज्ञान नसते|
नारद महर्षींच्यात दोन्ही होते, तसे तुम्ही आहात||
शक्ती असते तेथे बुद्धी नसते|
बुद्धी असते तेथे शक्ती नसते|
मारुतीरायांजवळ दोन्ही होते, तसे तुम्ही आहात||
विद्वत्ता असते तेथे नम्रता व आज्ञाधारकपणा नसतो|
नम्रता व आज्ञाधारकपणा असतो तेथे विद्वत्ता नसते|
आद्य शंकराचार्य व माझा ब्रम्हानंदबुवा यांच्यामधे दोन्ही होते, तसे तुम्ही आहात||
असे हे कौतुकाचे उद्गार खुद्द श्रीमहाराजांनी बाबांविषयी काढले. यात शंकाच नाही की बाबा श्रीमहाराजांना अतीव प्रिय होते.